(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून प्रखर उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना बुधवारी अखेर पावसाने दिलासा दिला. सकाळपासूनच आकाशात ढगांची गर्दी दिसत होती. वातावरणात गर्मी देखील तितकीच होती. दुपारच्या सुमारास गडगडाट, विजांचा कडकडाट आणि झोडपणाऱ्या वाऱ्यांसह पावसाने अचानक हजेरी लावली.
रत्नागिरीमध्ये उन्हाचा तडाखा वाढला होता. रत्नागिरी येथे तब्बल 35.5 अंश सेल्सियस इतके तापमान होते. मात्र पावसाच्या या अचानक एन्ट्रीने वाहनचालक नागरिकांची एकच भंबेरी उडाली. रेनकोट, छत्रीशिवाय बाहेर पडलेल्या अनेकांनी झाडाखाली, दुकानांच्या छपराखाली आसरा घेतला. दरम्यान, ऑक्टोबरच्या प्रारंभीच भात कापणीस सुरुवात केलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस चिंतेचा विषय ठरला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकावर पावसाच्या सरी कोसळल्याने भात ओलाव्यामुळे खराब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाईल की काय, अशी भीती देखील शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
पश्चिम-मध्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच बंगालच्या उपसागरातदेखील दक्षिण बांगलादेश आणि आसपासच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्याची स्थिती कोमोरीन भागाकडे येणार असल्याने लक्षद्वीप, केरळ, दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत रविवारपर्यंत (19 ऑक्टोबर) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. याचाच परिणाम म्हणजे, राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पाऊस पडू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींची शक्यता आहे. मात्र असे असले तरीही मोसमी पाऊस पुढील काही दिवसांत माघार घेईल असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

