(राजापूर / प्रतिनिधी)
रायपाटण (टक्केवाडी) येथील श्रीमती वैशाली शांताराम शेटे (वय ७४) या आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच लांजा–राजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीमती शेटे या एकट्याच राहत होत्या. सोमवारी वाडीतील ग्रामस्थांनी त्यांना शेवटचे पाहिले होते. त्यानंतर त्या कुणालाच दिसल्या नव्हत्या. बुधवारी सकाळी वाडीतील एका महिलेनं त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला, परंतु आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दरवाजा उघडण्यात आला असता आत मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच रायपाटण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी सुरेश कदम आणि निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरेन्सिक टीम, श्वानपथक आणि एलसीबीचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस विविध शक्यतांवरून तपास करत असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

