(गुहागर / रामदास गमरे)
बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र. २४ मौजे मुंढर – गाव व मुंबई शाखा, माता रमाई महिला मंडळ, विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्धांचा २५८७ वा जयंती उत्सव दर्शन तुकाराम गमरे यांच्या अध्यक्षतेखाली जैतवन बुद्धविहार, मुंढर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर प्रसंगी बौद्धजन सहकारी संघाचे माजी विश्वस्त, जेष्ठ साहित्यीक, कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकार राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांच्या शुभहस्ते ज्योत प्रज्वलित करण्यात आली तर मुंबई अध्यक्ष विनोद मोहिते यांनी पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण केले. तद्नंतर उपासक उपासिका यांनी बुद्धचरणी पुष्पसुमन अर्पण केली व सर्वच महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. विद्यार्थी विकास मंडळाने धार्मिक पूजापाठ सादर करून संस्कार समितीचे गाव शाखा अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी पूजापाठाची सांगता करून धम्मदेशना दिली व वैशाखी पौर्णिमेच आणि बुद्धपौर्णिमेच महत्व याविषयावर मौलिक विचार व्यक्त केले. सदर प्रसंगी निलेश गमरे व उमेश जाधव यांनी प्रभावीपणे सूत्रसंचालन करून प्रस्ताविक ही सादर केले. त्याचबरोबर कार्यक्रमाला आलेल्या माहेरवाशीनी, पाहुणे यांना अल्पोपहार व भोजनदान करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात काही स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी ५:०० ते ८:०० या वेळेत भगवान गौतम बुद्धांच्या तैलचित्राची भव्यदिव्य अशी मिरवणूक गाव व मुंबई शाखेचे ऐक्य दाखवीत मोठ्या दिमाखात काढण्यात आली. रात्री ९:०० वाजता माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदविकाधर, पदवीधर आणि विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बऱ्याच वर्षानंतर बौद्धवाडीतील महिला सरपंचा होण्याचा मान मिळालेल्या सौ. अमिषा अजित गमरे यांचा गाव-मुंबई शाखेच्या वतीने गावं अध्यक्ष दर्शन गमरे, मुंबई अध्यक्ष विनोद मोहिते, तालुक्याचे माजी विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, रमाई महिला मंडळ अध्यक्षा सानिका सचिन गमरे, उपाध्यक्षा स्नेहा शरद मोहिते यांच्या शुभहस्ते शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तद्नंतर बालकलाकार वंश विशाल गमरे, त्रिकाय वीरेंद्र गमरे, स्वरा मनीष जाधव कलाकारांनी नृत्यकलाविष्काराचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकून घेतली तसेच गुलशन पवार, जिनसुम भागूराम मोहिते, संदीप गमरे, भूषण संजय पवार, वीरेंद्र गमरे, विशाल गमरे, सौ. अर्चना गुलशन पवार, गुलशन रामचंद्र पवार, संदीप रामजी गमरे, आदी गायक कलावंतांनी गाणी, भीमगीते सादर करून रसिकांची मने जिकून घेतली.
जेष्ठ नागरिकांतून सरिता सुनील गमरे यांनी ही तरुणांना लाजवेल असे उत्साहात नृत्य सादर करून सर्वांना अचंबित केले, असा हा जयंती कार्यक्रम शांततेत, उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या अनिल जाधव, अजित गमरे, जनार्दन गमरे, विद्यार्थी विकास मंडळ, रमाई महिला मंडळ आणि गाव मुंबई शाखेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानून निलेश गमरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.