(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, कुचांबे या संस्थेने सहकार क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनतर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात या संस्थेला कोकण विभागातील प्रथम क्रमांकाचा ‘दीपस्तंभ’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सन २०२४–२५ या आर्थिक वर्षात शिववैभव पतसंस्थेने उल्लेखनीय आर्थिक प्रगती नोंदवली आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय ₹१५२ कोटींवर पोहोचला असून, ठेवी : ₹८५ कोटी, कर्जवाटप : ₹६५ कोटी, गुंतवणूक : ₹३० कोटी, भागभांडवल : ₹४ कोटी, निव्वळ नफा : ₹१ कोटी अशी कामगिरी साधली आहे.
संस्थेने शासनाच्या सहकार विभागाच्या नियमांचे काटेकोर पालन करत, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने C.D. Ratio 69.74%, CRR – 1.50%, SLR – 28.24%, आणि CRAR – 13.44% इतके उत्कृष्ट वित्तीय सूचकांक कायम ठेवले आहेत.
या यशामागे संस्थेचे चेअरमन सीए प्रकाश थेराडे, सचिव संतोष थेराडे, संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचा एकसंध प्रयत्न आहे. पारदर्शक कारभार, सभासदाभिमुख सेवा आणि सातत्यपूर्ण विकास यामुळेच संस्थेला सलग “अ” दर्जाचे ऑडिट मिळत आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे आणि अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर (सहकारी संस्था, पुणे) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने संतोष थेराडे, संजय कानल, जी.एम. रवींद्र थेराडे, संकेत थेराडे, कौस्तुभ मयेकर, सिद्धार्थ लाड आणि सल्लागार बाळकृष्ण काष्टे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
चेअरमन प्रकाश थेराडे यांनी सांगितले की, “सप्टेंबर २०२५ अखेर संस्थेच्या ठेवी ₹९६ कोटींवर पोहोचल्या असून, दिवाळीपर्यंत ₹१०० कोटींचा टप्पा पार करण्याचे लक्ष्य आहे.”
या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी आणि सभासदांचे अभिनंदन होत असून, शिववैभव पतसंस्थेचा सातत्यपूर्ण प्रगतीचा आलेख इतर सहकारी संस्थांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

