(संगमेश्वर / वार्ताहर)
संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर मडगाव, जामनगर आणि पोरबंदर या तीन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याच्या मागणीसंदर्भात कोकण रेल्वे प्रशासन आणि भारतीय रेल्वे मंडळाकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मागील अडीच वर्षांत तीन वेळा सादर करण्यात आलेला हा प्रस्ताव सततच्या पाठपुराव्यानंतरही प्रलंबित असून, आता या प्रश्नावर देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे साकडे घालण्यात आले आहे.
स्थानिक आमदार, खासदार, विविध सामाजिक संस्था आणि संघटनांनी वारंवार निवेदनं दिली; आंदोलनं, उपोषणं, निदर्शनं केली; परंतु कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाने केवळ एकमेकांकडे बोट दाखवत वेळ मारून नेल्याचा आरोप प्रवासी संघटनांकडून केला जात आहे
ही केवळ एका थांब्याची मागणी नसून सामान्य प्रवाशांच्या भावनांशी संबंधित प्रश्न आहे, असे निसर्गरम्य चिपळूण–संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपतर्फे सांगण्यात आले. सदर मागणीसंदर्भात आता भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती महोदयांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात संगमेश्वर भूमीचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत पांडवकालीन शिल्पे, श्री क्षेत्र मार्लेश्वर, टिकलेश्वर, कर्णेश्वर आणि सप्तेश्वर अशी प्रसिद्ध देवालये आहेत. शिवाय, महाराष्ट्र सरकारकडून प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारकही याच परिसरात उभारण्यात येणार आहे. अशा पर्यटनदृष्ट्या समृद्ध भागात रेल्वे थांबे नसल्याने प्रवाशांना दररोज प्रवासात प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
दिवसाला १,८७७ प्रवासी – वार्षिक उत्पन्न तब्बल ६ कोटी
सध्या संगमेश्वर रोड स्थानकावर दररोज सुमारे १,८७७ प्रवासी रेल्वेचा वापर करतात. यामधून कोकण रेल्वेला दरवर्षी सुमारे ६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रवास असूनही स्थानकावर आवश्यक एक्स्प्रेस थांबे नसणे ही प्रवाशांसाठी अन्यायकारक बाब असल्याचे सांगण्यात आले.
कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कार्यालयात व्यवस्थापकीय संचालकांच्या उपस्थितीत या मागणीसंदर्भात दोन बैठकाही झाल्या. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, खासदार नारायण राणे तसेच पद्मश्री दादा इदाते यांनीही या विषयावर चर्चा केली, परंतु ठोस निर्णय न झाल्याने स्थानिक प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.
आता ‘दिल्ली’कडे मोर्चा – न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच!
या प्रलंबित मागणीसाठी आता निसर्गरम्य चिपळूण–संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपतर्फे थेट देशाच्या सर्वोच्च पदाधिकाऱ्यांकडे साकडे घालण्यात आले आहे. “आमचा लढा हा संगमेश्वर रोड स्थानकाला न्याय मिळेपर्यंत सुरू राहील,” असा निर्धार संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.

