(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील डिंगणी कुरण बागवाडी येथे ग्रामपंचायतीच्या निधीबाबत जाब विचारल्याचा राग मनात धरून उपसरपंचासह सात जणांनी एका शेळीपालक ग्रामस्थावर घरात घुसून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादीच्या पत्नीलाही धक्काबुक्की करून जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी उपसरपंचासह दोन नामनिर्देशित आणि पाच अनोळखी व्यक्तींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.
फिर्यादी दीपक गोविंद राऊत (वय ५२, व्यवसाय शेळीपालन, रा. डिंगणी कुरण बागवाडी, ता. संगमेश्वर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी क्रमांक १ मिथुन मनोहर निकम (रा. डिंगणी चाळकेवाडी) हा गावाचा उपसरपंच असून, ‘जलजीवन मिशन’ आणि ‘वसुंधरा पाणलोट योजना’ या प्रकल्पांत आलेल्या निधीच्या खर्चावर प्रश्न उपस्थित केल्याचा राग आरोपींनी धरला होता. राऊत यांनी ९ ऑक्टोबर रोजी उपसरपंच निकम यांना दूरध्वनीवरून आगामी ग्रामपंचायतीच्या सभेत निधीचा तपशील सादर करण्यास सांगितले होते. याच गोष्टीचा मनात आकस धरून १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उपसरपंच मिथुन निकम, स्वप्निल सुर्वे (रा. कोंड आंबेड) व पाच अनोळखी इसमांनी एकत्र येऊन राऊत यांच्या घरात जबरदस्ती प्रवेश केला.
घरात घुसताच आरोपींनी, गावात आमच्याविरुद्ध बोलतोस, सरपंच पदासाठी उभा राहतोस, आता दाखवतोच तुला, असे म्हणत शिवीगाळ केली आणि राऊत यांना हाताने तसेच लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. पत्नी शिला राऊत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनाही आरोपींनी थापटाने मारहाण करून तुम्हा तिघांना ठार मारू, अशी धमकी दिली. या गंभीर घटनेनंतर जखमी राऊत यांनी तात्काळ संगमेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेऊन रात्री १०.३२ वाजता फिर्याद दाखल केली.
या तक्रारीवरून उपसरपंच मिथुन निकम, स्वप्निल सुर्वे आणि पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध घरात घुसखोरी, मारहाण, धमकी आणि सरकारी कामात अडथळा अशा विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपसरपंच निकम यांच्यावर यापूर्वीही कलम ३५३ व ३३२ अंतर्गत गुन्हा नोंद झाला होता, मात्र तेव्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता दिली होती. सध्याच्या प्रकरणाचा पुढील तपास संगमेश्वर पोलिसांकडून सुरू आहे.
गावातील स्थानिक नेतृत्व जे निधी आणि योजनांवरील अधिकाराचा दुरुपयोग करते, तेव्हा सामान्य नागरिकांचा आवाज दडपला जातो, धमक्या दिल्या जातात आणि घरात घुसखोरीसारख्या घातक घटनांमुळे भयाची पाटी रचली जाते. दीपक राऊत यांच्या बाबतीत घडलेली मारहाण हे याचे दुःखद उदाहरण आहे. अशा परिस्थितीत पोलीस प्रशासनाचे सक्रिय, निष्पक्ष आणि ठोस हस्तक्षेप अत्यावश्यक आहे. पोलिसांचा धाक केवळ गुन्हेगारांवरच नाही, तर समाजात न्याय आणि सुरक्षा याची जाणीव निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा आहे. जेथे पोलिस प्रशासन तत्पर असते, तिथे नागरिक आपले हक्क विचारण्यास मोकळे असतात, यातून भ्रष्टाचार आणि दडपशाही कमी होते. अशा गावगुडांना पोलिसांचा धाक असणे म्हणजे सामाजिक न्यायाचे रक्षण, नागरिकांचा आत्मविश्वास आणि स्थानिक प्रशासनातील पारदर्शकता सुनिश्चित करणे हीच खरी गरज आहे.

