( मुंबई )
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील समन्वय राखण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला आहे. “मित्रपक्षांमध्ये मतभेद होऊ देऊ नका, एकत्र येऊन निवडणुका लढवा, आणि एकमेकांवर टीका-टिप्पणी टाळा,” अशी स्पष्ट ताकीद फडणवीस यांनी भाजपाच्या जिल्हा निवडणूक प्रभारींना मंगळवारी दिली. याच बैठकीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपाचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्तीही करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी भाजपाच्या जिल्हा प्रभारींची बैठक झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नुकत्याच जिल्हा प्रभारींच्या नियुक्त्या झाल्या असून, या बैठकीत निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, राज्यातील संघटन मंत्री, महामंत्री आणि मंत्रीमंडळातील सदस्य उपस्थित होते. तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत विभागनिहाय निवडणूक नियोजन आणि उमेदवार निवड प्रक्रियेवर चर्चा झाली.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना फ्री हँड
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. चव्हाण यांना ठाणे जिल्ह्यात ध्येय्य साध्य करता यावे यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका वगळून राज्याच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नवी मुंबईतून वनमंत्री गणेश नाईक आधीपासूनच एकनाथ शिंदे यांच्याशी संघर्ष करत आहेत. अशातच शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देत रविंद्र चव्हाण यांनी ठाणे-कल्याण डोंबिवली महापालिकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. बावनकुळेंवर प्रभारीपदाची जबाबदारी देत रविंद्र चव्हाण यांना ठाणे जिल्ह्यात फ्री हँड देण्यात आला आहे.
महायुतीत समन्वयासाठी तीन सदस्यीय समिती
बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, “महायुतीत समन्वय टिकवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तीन मंत्र्यांची समिती स्थापन केली जाईल. या समितीत एक भाजपा, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री असेल. महायुतीतील कोणत्याही स्तरावर मतभेद किंवा मनभेद होऊ नयेत, याची जबाबदारी भाजपाची असेल,” असे ते म्हणाले.
तसेच, “महायुतीच्या माध्यमातून राज्यभर 51 टक्के मते मिळवून आम्ही दोन-तृतीयांश बहुमताने सर्व निवडणुका जिंकू. महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये भाजपा-महायुती प्रचंड बहुमताने विजयी होईल,” असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.
भाजपाची निवडणूक यंत्रणा सज्ज
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपाने पक्षांतर्गत यंत्रणा पूर्णपणे सक्रिय केली आहे. पक्षाच्या निरीक्षकांनी राज्यभरातील नगर परिषद आणि नगर पंचायतींना भेट देऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. त्यानुसार प्रत्येक नगराध्यक्षपदासाठी तीन संभाव्य उमेदवारांची नावे सुचवण्यात आली असून, त्या याद्या जिल्हा प्रभाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. बैठकीत या यादीवर सविस्तर चर्चा झाली आणि काही ठिकाणी नावांची अंतिम निवड करण्यात आली. शिवाय, संभाव्य उमेदवारांच्या निवडणूक क्षमतेचे स्वतंत्र सर्वेक्षणही करण्यात आले असून, त्याचे अहवाल बैठकीत सादर झाले. काही ठिकाणी चौथे पर्याय म्हणून नवीन नावेही समोर आली आहेत.
बैठकीनंतर कोअर कमिटीची स्वतंत्र बैठक घेऊन उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ भाजप नेत्याने दिली.

