(ठाणे)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते उल्हासनगर कॅम्प ३ येथील नव्याने बांधलेल्या गांधी भवन कार्यालय व सभागृहाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या वेळी सपकाळ यांनी भाजप-शिवसेना महायुतीवर निशाणा साधत आगामी निवडणुकीसाठी ‘पैसा फेक तमाशा’ हे घोषवाक्य जाहीर केले. तसेच, दिवाळीनंतर भ्रष्टाचारविरोधात बोंबा मार आंदोलनही राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. गांधी भवनाची पुनर्निर्मिती उल्हासनगर काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवे, ब्लॉक अध्यक्ष नानिक आहुजा, किशोर धडके, सुनील बेहरानी व प्रवक्ता आसाराम टाक यांच्या प्रयत्नांनी पूर्ण झाली. उद्घाटनानंतर काँग्रेसने भाजप-शिवसेना प्रशासकीय राजवटीतील भ्रष्टाचाराचा अहवाल जाहीर केला.
सपकाळ म्हणाले, “काँग्रेस म्हणजे सत्य आणि स्वप्न यांचे प्रतिक आहे. या देशाला काँग्रेसने घडवले आणि उल्हासनगर शहराला उभे केले. मात्र, युती सरकारने शहराचे खड्डयात रूपांतर केले आहे. उल्हासनगर महापालिका भ्रष्टाचाराने भरलेली आहे; अंध-अपंगांच्या छड्यांवरही लक्ष दिले जात नाही, तर नागरिकांचे काय होईल?”
अहवालात दिव्यांगांच्या छडी विक्रीतील घोटाळा, टीडीआर वाटपातील गैरव्यवहार, कर विभागातील सवलतीत भ्रष्टाचार, कोणार्क कंपनीच्या कचरा व पाणीपुरवठा ठेक्यांतील अनियमितता, तसेच शहाड महानगरपालिका रुग्णालयातील ठेक्यांतील गैरप्रकार उघड करण्यात आले. जिल्हाध्यक्ष रोहित साळवे म्हणाले, “उल्हासनगरमध्ये भाजप ठेकेदारांची टोळी बनली आहे; प्रशासनावर त्यांचा अंकुश नाही, त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत समस्या वाढल्या आहेत. काँग्रेस कार्यकर्ते आता या भ्रष्ट कारभाराचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचवतील.”
उद्घाटन समारंभात प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राणी अग्रवाल, उल्हासनगर प्रभारी नवीन सिंह, कल्याण अध्यक्ष सचिन पोटे, अंबरनाथ अध्यक्ष प्रदीप पाटील, माजी नगरसेविका अंजली साळवे, डॉ. हितेश सचवणी, पवन मिरानी, शंकर आहुजा, अजीज खान, विशाल सोनवणे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

