( रायगड )
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगड जिल्ह्यात आज (शनिवारी) सकाळी भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबईहून कोकणाच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका खासगी कारने मागून एका अवजड कंटेनरला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला.
हा अपघात कोलाडजवळील पुई गावाच्या परिसरात आज सकाळी घडला. प्राथमिक माहितीनुसार, कार अतिवेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोर असलेल्या कंटेनरच्या मागील भागावर कार आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचे सुट्टे भाग महामार्गावर सर्वत्र विखुरले गेले.
या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने कोलाड येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कारचा पुढचा भाग पूर्णपणे कंटेनरमध्ये घुसल्याने मृत व जखमींना बाहेर काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या एका व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी हायड्रॉलिक कटरचा वापर करण्यात आला. बचावकार्यामध्ये सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे रेस्क्यू पायलट सक्रियपणे सहभागी झाले होते.
या भीषण अपघातामुळे काही काळ मुंबई–गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत असून महामार्गावरील वाढते अपघात पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरत आहेत.

