(मुंबई)
कायम शाकाहारी पदार्थ बनवण्यास प्रसिद्ध असलेले सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांनी यावेळी एक अनोखा प्रयोग करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्यांनी 5,001 अंड्यांची भुर्जी बनवून जागतिक विक्रम रचला आहे. हा उपक्रम महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत नागपूरच्या पशुवैद्यक महाविद्यालयाच्या कुक्कुटपालन शास्त्र विभागाने आयोजित केला होता. 10 ऑक्टोबरला साजरा झालेल्या जागतिक अंडी दिवसाच्या (World Egg Day) निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये अंड्यांविषयी जनजागृती करणे हा मुख्य उद्देश होता.
अनेक जागतिक विक्रम नोंदवलेले शेफ विष्णू मनोहर यापूर्वी अमरावती येथे सुमारे 5,000 किलो भरडधान्याची खिचडी बनवून नवा विक्रम रचला होता. तर यावेळी त्यांनी अंड्याचा पदार्थ बनवल्याने कायम शाकाहारी पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या शैलीतला अप्रत्याशित प्रयोग झाल्याचे चर्चेत आहे. हा विक्रम फक्त अंड्यांची भुर्जी बनवण्यापुरता मर्यादित न राहता अंड्यांविषयी जनजागृती आणि आरोग्यदायी आहाराविषयीही संदेश देण्यास उपयुक्त ठरला आहे.

