(मुंबई)
कोकणवासीयांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मुंबई-कोकण प्रवास आता सोपा, सुरक्षित आणि जलद होणार आहे. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली ‘रो-रो’ फेरीसेवा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होण्याची शक्यता आहे.
सागरी महामंडळाने सर्व परवानग्या व तांत्रिक तयारी पूर्ण केली असून, समुद्रस्थिती अनुकूल होताच सेवा सुरू केली जाणार आहे. गणेशोत्सवातच सुरुवात होईल अशी अपेक्षा होती; मात्र हवामान व परवानग्यांमधील अडथळ्यांमुळे विलंब झाला होता. आता जयगड व विजयदुर्ग जेट्टीवर आवश्यक सुविधा उभारल्या आहेत. प्रवाशांसाठी बससेवाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ही सेवा सुरू झाल्यास कोकण प्रवासासाठी महामार्गावरील तासन्तास कोंडी, अपघातांचा धोका आणि रेल्वे तिकिटांची धावपळ यापासून दिलासा मिळणार आहे.
सेवा कशी असेल?
मार्ग : भाऊचा धक्का (मुंबई) → जयगड / विजयदुर्ग
प्रवास वेळ :
- मुंबई–रत्नागिरी : ३ ते ३.५ तास
- मुंबई–सिंधुदुर्ग : ५ तास
वेग : २५ नॉट्स (दक्षिण आशियातील सर्वात वेगवान प्रवासी बोट)
क्षमता
- प्रवासी : ५५२ (इकोनॉमी), ४४ (प्रीमियम इकोनॉमी), ४८ (बिझनेस), १२ (फर्स्ट क्लास)
- वाहनं : ५० चारचाकी, ३० दुचाकी
तिकीट दर
- इकोनॉमी : ₹२,५००
- प्रीमियम इकोनॉमी : ₹४,०००
- बिझनेस : ₹७,५००
- फर्स्ट क्लास : ₹९,०००
वाहन दर
- चारचाकी : ₹६,०००
- दुचाकी : ₹१,०००
- सायकल : ₹६००
- मिनी बस : ₹१३,०००
प्रायोगिक चाचणीत ही सेवा यशस्वी ठरली असून सागरी सुरक्षा यंत्रणांकडून हिरवा कंदील मिळाला आहे. दसऱ्यापासून मुंबई-कोकण प्रवासासाठी ‘रो-रो’ सेवा हा नवा व सोयीस्कर पर्याय ठरणार आहे.

