(ठाणे)
दिवा-शीळ रोडवरील खर्डीगाव येथे ओव्हरहेड विद्युत तारेवर अडकलेल्या कबुतराची सुटका करताना झालेल्या दुर्दैवी अपघातात अग्निशमन दलाचा जवान विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडला. ही घटना रविवारी दुपारी घडली. उत्सव पाटील (२८, रा. दातिवली गाव) असे मृत जवानाचे नाव असून, त्याचा सहकारी आझाद पाटील (२९, रा. वाडा) गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेमध्ये, टोरंट कंपनीच्या ओव्हरहेड वायरवर कबुतर अडकले असल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. उत्सव पाटील आणि आझाद पाटील यांनी कबुतराला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला असता, दोघांनाही जोरदार विजेचा धक्का बसला. तातडीने दोघांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी उत्सव पाटील यांना मृत घोषित केले. आझाद पाटील यांचा हात आणि छाती गंभीर भाजल्यामुळे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच उपायुक्त दिनेश तायडे, अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी गिरीश झळके आणि अन्य अधिकारी तातडीने रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी जखमी जवानाची विचारपूस केली आणि अपघाताची माहिती घेतली.
दरम्यान, या दुर्घटनेदरम्यान जवानांनी आवश्यक सुरक्षा उपकरणे वापरलेली नव्हती, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जात नाही, असा आरोपही नागरिकांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि कंत्राटी अग्निशमन कर्मचाऱ्यांना सुरक्षित कार्यपरिसर द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते रोहिदास मुंडे यांनी केली आहे.

