(राजापूर)
तालुक्यातील पेंडखळे भवानी मंदिर परिसरात मंगळवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक बसलेल्या तीव्र विद्युत धक्क्याने तिथवली येथील रहिवासी आणि वायरमेन अनिकेत परवडी (वय 27) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे राजापूर शहरासह तिथवली गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वीजवाहिनी बंद करून दुरुस्तीचे काम करण्यासाठी अनिकेत परवडी खांबावर चढले होते. मात्र काम सुरू असतानाच अज्ञात कारणाने अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्यांना जोरदार धक्का बसला. या धक्क्यामुळे तोल जाऊन अनिकेत खाली कोसळले. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला.
अनिकेत परवडी यांना गंभीर अवस्थेत सायंकाळी उशिरा राजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच वीज वितरण विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.
अवघ्या 27 व्या वर्षी झालेल्या या अपघाती निधनामुळे तिथवली गावात तसेच राजापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्तव्य बजावत असताना एका तरुण वायरमेनचा जीव गेल्याने सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घटनेबाबत पुढील तपास सुरू असून वीजवाहिनी बंद असतानाही विद्युत प्रवाह कसा सुरू झाला, याचा शोध घेतला जात आहे. अनिकेत परवडी यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार शोकसागरात बुडाले असून परिसरात शोकमय वातावरण आहे.

