(रत्नागिरी / वार्ताहर)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत धामणसे ग्रामपंचायतीत ग्रामस्थ, महिला बचत गट आणि विविध संस्थांच्या सहकार्याने स्वच्छता व श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण गावभर राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या मोहिमेदरम्यान ग्रामपंचायत परिसर, सार्वजनिक ठिकाणे, रस्ते आणि शाळा परिसर स्वच्छ करण्यात आले. तसेच स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी वार्डनिहाय सभा आणि कॉर्नर सभा घेण्यात आल्या. प्रत्येक वार्ड सदस्याच्या नेतृत्वाखाली गावातील नागरिकांनी श्रमदान करत गाव सुशोभित करण्याचा संकल्प केला.
ग्रामसभेत ठरविण्यात आलेल्या निर्णयानुसार प्रत्येक कुटुंबाने ₹200 लोकवर्गणी देण्याचा निर्धार केला आहे. याशिवाय गावातील विविध संस्था, श्री रत्नेश्वर वाचनालय, कार्यकारी सोसायटी, हायस्कूल, शाळा सुधार समिती आणि इतर स्थानिक संस्थांच्या माध्यमातून एकूण ₹20,000 लोकवर्गणी जमा झाली आहे.
ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. ऋतुजा कुलकर्णी यांनी आपल्या एक महिन्याच्या मानधनाची रक्कम ₹3,000/- या अभियानासाठी देणगी म्हणून दिली. तसेच गावातील शिक्षक वर्गानेही सक्रिय सहभाग नोंदवून आर्थिक योगदान दिले.
या उपक्रमात सरपंच श्री. अमर रहाटे, उपसरपंच सौ. ऋतुजा कुलकर्णी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला वर्ग, ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष देविदास इंगळे, जिल्हा सचिव संजय दळवी, जिल्हा महिला संघटक सानिका शिंदे, प्रभारी सचिव जी. के. खरंबाळे, महिला उपाध्यक्ष पूजा कोकरे, जिल्हा माहिती प्रमुख संजय कुंभार, विष्णुदास बुंदे, सुरेश भगत, संतोष रोकडे, उल्हास कोळी, विजय बेंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
धामणसे ग्रामस्थांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांना सातत्याने हातभार लावण्याचे आश्वासन दिले आहे.
(फोटो : दिनेश पेटकर, गावखडी)

