(रत्नागिरी / वार्ताहर)
पावसाळ्यात ग्राहकांना दर्जेदार, अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणकडून रत्नागिरी जिल्ह्यात व्यापक मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार नियोजनबद्ध पद्धतीने ही कामे हाती घेण्यात आली असून, पावसाळ्यात वीजपुरवठ्यातील बिघाड कमीत कमी राहावा यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे.
महावितरणकडून जिल्ह्यातील उच्चदाब व लघुदाब वीजवाहिन्या तसेच विविध वीज उपकरणांची प्राधान्यक्रमानुसार तपासणी व दुरुस्ती करण्यात आली. उपरी वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडणे, तुटलेले पिन व डिस्क इन्सुलेटर बदलणे, जळालेले अथवा खराब जंपर बदलणे, वाकलेले किंवा गंजलेले वीजखांब बदलणे, सैल झालेल्या तारा योग्य ताण देऊन दुरुस्त करणे अशी विविध कामे करण्यात आली.
तसेच लघुदाब वाहिन्यांवर पीव्हीसी स्पेसर्स बसविणे, उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांना गार्डिंग पुरविणे, रस्ता क्रॉस करणाऱ्या वाहिन्यांची तपासणी करून त्यांचा ताण योग्य ठेवणे, वीजखांबांचे अर्थिंग तपासणे व आवश्यक दुरुस्ती करणे यावर भर देण्यात आला.
वितरण रोहित्रांचीही सखोल तपासणी करण्यात आली असून, जळालेल्या केबल बदलणे, अर्थिंग दुरुस्ती, तेलगळती तपासणी, ब्रीदरमधील सिलिका जेल बदलणे, तसेच खराब लाईटनिंग अरेस्टर बदलण्याची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. भूमिगत वीजवाहिन्यांवरील तात्पुरते जॉइंट कायमस्वरूपी करण्यात आले असून, फीडर पिलर व वितरण पेट्यांचीही दुरुस्ती करण्यात आली आहे.
उपकेंद्रांमधील वाढलेले गवत काढणे, स्वच्छता मोहीम राबविणे, बॅटरींची तपासणी, आयसोलेटर अलाइनमेंट दुरुस्ती, जळालेल्या केबल बदलणे आदी कामेदेखील पूर्ण करण्यात आली आहेत.
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी रोहित्र ऑईल, वीजखांब, इन्सुलेटर यांसह आवश्यक साहित्य व उपकरणांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. तसेच पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 7875765018 उपलब्ध असून, आपत्कालीन परिस्थितीत नागरिक व वीजग्राहकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तसेच शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे 1912, 1800-212-3435 आणि 1800-233-3435 हे २४ तास सुरू असलेले टोल फ्री क्रमांकही उपलब्ध आहेत.

