(गणपतीपुळे / वैभव पवार)
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्ध समाजाचे सर्वोच्च आणि पवित्र श्रद्धास्थान आहे. तथागत भगवान बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली त्या स्थळाचे आजही बौद्ध समाजाकडे संपूर्ण स्वामित्व नाही, ही अत्यंत दुःखद आणि अन्यायकारक बाब आहे. महाकारुणिक भगवान बुद्धांनी अंधश्रद्धा, कर्मकांड आणि पिंडदानास विरोध केला होता, परंतु आजही या पवित्र स्थळी अशा कृती घडत असल्याने जागतिक बौद्ध जनतेच्या भावना खोलवर दुखावल्या जात आहेत.
सध्या महाबोधी महाविहार व्यवस्थापन ट्रस्ट मध्ये चार हिंदू, चार बौद्ध सदस्य आणि चेअरमन म्हणून जिल्हाधिकारी अशी रचना आहे. त्यामुळे हे स्थळ पूर्णतः बौद्धांच्या ताब्यात नाही. बिहार टेंपल मॅनेजमेंट ॲक्ट १९४९ (बी.टी. ॲक्ट) हा ब्रिटिश काळातील कायदा तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी बौद्ध नेते आणि संघटनांनी केली आहे. कारण भारताचे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले असून त्यापूर्वीचा १९४९ चा हा कायदा घटनाबाह्य ठरतो.
जसे प्रत्येक धर्माची धार्मिक स्थळे त्या त्या धर्माच्या ट्रस्टच्या ताब्यात असतात — हिंदूंच्या मंदिरात हिंदू ट्रस्टी, मुस्लिमांच्या मशिदीत मुस्लिम ट्रस्टी, शीखांच्या गुरुद्वाऱ्यात शीख ट्रस्टी — तसेच बौद्धांच्या महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात असले पाहिजे, हीच बौद्ध समाजाची न्याय्य मागणी आहे.
याच मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन गट, बौद्ध आंबेडकरी संघटना आणि सर्वपक्षीय बौद्ध नेते एकत्र येऊन “महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन” उभारले असून येत्या १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता मुंबईतील आझाद मैदान येथे शांततापूर्ण विराट रॅली आयोजित करण्यात आली आहे.
या रॅलीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सर्व बौद्ध-आंबेडकरी जनतेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ना. रामदास आठवले यांच्या सोबत प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, नानासाहेब इंदिसे, खासदार वर्षा गायकवाड, खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार संजय बनसोडे, राजू वाघमारे, अविनाश महातेकर, गौतम सोनवणे, तानसेन ननावरे, जयदीप कवाडे, विलास रूपवते, मिलिंद सुर्वे, नितीन मोरे, सिद्धार्थ कासारे यांसह अनेक बौद्ध आणि रिपब्लिकन नेते उपस्थित होते.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीत खालील प्रमुख नेत्यांचा सहभाग आहे: ना. रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, नानासाहेब इंदिसे, ॲड. सुरेश माने, चंद्रबोधी पाटील, डॉ. नितीन राऊत, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार वर्षा गायकवाड, मंत्री संजय शिरसाट, आ. संजय बनसोडे, आ. राजकुमार बडोले, देशक खोब्रागडे, सुलेखाताई कुंभारे, अर्जुन डांगळे, जयदेव गायकवाड, अक्षय आंबेडकर, जयदीप कवाडे, अविनाश महातेकर, राजू वाघमारे, पद्मश्री कल्पना सरोज, दीपक निकाळजे, कुणाल बबन कांबळे, बुद्धभूषण गोटे, दीपक केदार, सिद्धांत गाडे, अशोक कांबळे, सुनील डोंगरे, तानसेन ननावरे, काकासाहेब खंबाळकर, नितीन मोरे, बाळासाहेब पडवळ, मिलिंद सुर्वे, विलास रूपवते, रवी गरुड, जयमंगल धनराज, अनिकेत संसारे, गगन मलिक, विठोबा पवार, ॲड. दिलीप काकडे, कनिष्क टी. कांबळे, सुनील रामटेके, एन. के. कांबळे, नागसेन कांबळे, लक्ष्मण भगत, गौतम सोनवणे, सिद्धार्थ कासारे, सुरेश बार्शिंग, प्रकाश मोरे, दादासाहेब मर्चंडे आणि अन्य सर्व रिपब्लिकन गट व बौद्ध धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी.
तसेच, भंते विनाचार्य, भदंत राहुल बोधी महाथेरो, भदंत विरत्न थेरो, भंते हर्षबोधी, भदंत बोधिशील, भदंत शांतिरत्न, भंते विनय बोधी महाथेरो, भदंत आकाश लामा यांसारखे अनेक पूज्य बौद्ध भिक्षू या कृती समितीचा भाग आहेत.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी १४ ऑक्टोबर ही तारीख सर्वानुमते निश्चित करण्यात आली आहे. हीच ती ऐतिहासिक तारीख आहे ज्यादिवशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन भारतात धम्मचक्र प्रवर्तन केले.
त्यामुळे या दिवशी, धम्मासाठी एक दिवस अर्पण करूया! या भावनेतून सर्व बौद्ध-आंबेडकरी जनता, कार्यकर्ते आणि संघटना एकत्र येऊन मुंबईच्या आझाद मैदानावर या ऐतिहासिक रॅलीत सामील होणार आहेत.

