(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. झुंडीने फिरणाऱ्या या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून लहान मुले, वयोवृद्ध आणि दुचाकीस्वार यांच्यावर ते हल्ले करीत आहेत. गेल्या नऊ महिन्यांत जिल्ह्यात तब्बल २,३२७ नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने, यामध्ये एकाही घटनेत मृत्यू झालेला नाही.
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप, जे.के. फाईल्स, मारुती मंदिर, कोकणनगर, मजगाव, जयस्तंभ, एसटी बसस्थानक, मांडवी, कारवांचीवाडी, लक्ष्मी चौक, रेल्वे स्टेशन परिसर अशा ठिकाणी कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. ही कुत्री नागरिकांचा पाठलाग करत असून, त्यांच्या अंगावर धावून येत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
रत्नागिरीप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या समस्येचे प्रमाण वाढले असून, नागरिकांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक ५३७ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. मात्र, सर्वांवर वेळेवर उपचार झाल्याने गंभीर परिणाम टळले आहेत.
कचऱ्यातून अन्न शोधणारी हिंस्र कुत्री
अनेक गावांत कचरा वेळेवर न उचलल्याने कुत्र्यांची गर्दी झपाट्याने वाढत आहे. बाजारपेठ, हॉटेल्स आणि चायनीज सेंटरसमोर पडलेले उष्टे अन्नपदार्थ, मासळीचे अवशेष आणि टाकाऊ मांसावर ही कुत्री ताव मारतात. परिणामी, ही कुत्री अधिक आक्रमक आणि हिंस्र बनत आहेत. नागरिकांच्या हालचालीवर सतत लक्ष ठेवणारी ही कुत्री झुंडीने फिरत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दापोलीत चिमुकलीवर हल्ला
गेल्या महिन्यात दापोली शहरात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने धुमाकूळ घातला होता. एका चिमुकलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी करण्यात आले होते. तालुक्यातील इतर गावांतही अशा घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी तातडीने कुत्र्यांच्या निर्बंधासाठी मोहीम हाती घेऊन लसीकरण, पकडमोहीम आणि कचरा व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, येत्या काळात हा प्रश्न सार्वजनिक सुरक्षेचा मोठा धोका ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

