(मुंबई)
‘माझ्या रुपावर फिदा झाली दुनिया सारी’ — या ओळींनी सजलेले ‘सोनचाफा’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. नृत्यांगना गौतमी पाटीलच्या आकर्षक अदा आणि ठेका धरायला लावणाऱ्या नृत्यानं या गाण्याला अफाट लोकप्रियता मिळाली आहे. गौतमीच्या मोहक अदा आणि नृत्याने या गाण्याला विशेष वजन आलं. गाण्याच्या ओळींनी आणि गौतमीच्या नृत्याने सर्वांनाच थिरकायला भाग पाडलं आहे. या गाण्यातील गौतमीच्या डान्ससह तिचा लूकही खूप व्हायरल झाला.
नवरात्रोत्सवात तर हे गाणं प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरलं होतं. विविध कार्यक्रमांमध्ये गौतमीने ‘सोनचाफा’वर थिरकणारी परफॉर्मन्सेस सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या. तिच्या नृत्यशैलीबरोबरच गाण्यातील मोहक लूक आणि अदा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत.
या गाण्याला ‘साईरत्न एंटरटेनमेंट’ या प्रॉडक्शन हाऊसने निर्मिती केली आहे. संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर हे निर्माते असून, अर्चित वरवडे यांनी दिग्दर्शन केलं आहे. गाण्याचे संगीत रोहित नागभिडे यांनी दिलं असून, गायिका मुग्धा कऱ्हाडे हिचा मधुर आवाज आणि गीतकार वैभव देशमुख यांच्या शब्दांनी या गाण्याला खास उठाव दिला आहे.
‘सोनचाफा’पूर्वी गौतमी पाटीलने याच बॅनरअंतर्गत ‘सुंदरा’ आणि ‘कृष्ण मुरारी’ ही दोन गाणी केली होती, जी प्रेक्षकांमध्ये प्रचंड गाजली. त्यानंतर आता तिचं ‘सोनचाफा’ हे नवं गाणं सध्या सर्व वयोगटातील प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडत आहे. सोशल मीडियावर या गाण्यावर अनेक रील्स आणि डान्स व्हिडिओज व्हायरल होत असून, प्रेक्षक गौतमीच्या उत्साही परफॉर्मन्सचं कौतुक करत आहेत. ‘माझ्या रुपावर फिदा झाली दुनिया सारी’ या गाण्याच्या तालावर सध्या संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः नाचतो आहे, असेच म्हणावे लागेल.

