(चिपळूण)
देशाचे सरन्यायाधी भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवर थेट आघात असल्याची तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) च्या चिपळूण तालुका शाखेने व्यक्त केली आहे. या घटनेचा पक्षाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला असून, गुन्हेगारांना तात्काळ अटक करून न्यायसंस्थेची प्रतिष्ठा अबाधित ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज (दि. ९) प्रांतधिकारी यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यासाठी सादर करण्यात आले.
पक्षाच्या वतीने जारी निवेदनात म्हटले आहे की, “न्यायव्यवस्था ही देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाच्या अधिकारांची हमी देणारी संस्था आहे. तिच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीवर हल्ला होणे म्हणजे न्यायसंस्थेचा आणि लोकशाहीचा अपमान आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्यावी.”
या वेळी तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, प्रदेश चिटणीस एम. बंदूकवाले, सीताराम शिंदे, प्रकाश साळवी, निलेश चव्हाण (ओबीसी अध्यक्ष), विलास चिपळूणकर, संजय तांबडे, प्रवीण रेडीज, युवक शहराध्यक्ष श्रीनाथ खेडेकर, कामगार संघटना अध्यक्ष करुनेश ताम्हनकर, शरद खापरे, महिला अध्यक्षा दीपिका कोटवडेकर, राधिका तटकरे, सुझाता दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

