(रत्नागिरी)
राज्याच्या सागरी जलक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पर्ससिननेट, मिनी पर्ससिननेट आणि एलईडीद्वारे बेकायदेशीर मासेमारी सुरू असून, या प्रकाराला सागरी सुरक्षा रक्षकांचा आशीर्वाद असल्याचा गंभीर आरोप शाश्वत मच्छीमार हक्क संघाचे अध्यक्ष रणजित ऊर्फ छोट्या भाटकर यांनी केला आहे. त्यांनी बुधवारी रत्नागिरी येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयात धडक देत तात्काळ कारवाईची मागणी केली. अन्यथा “संयम सुटेल आणि कार्यालयालाच टाळे ठोकू” असा इशारा संघाने दिला.
भाटकर म्हणाले की, “राज्याच्या जलक्षेत्रात म्हणजेच 12.5 नॉटिकल मैलांच्या आतील समुद्रात पर्ससिन आणि मिनी पर्ससिन मासेमारी करण्यास स्पष्ट बंदी आहे. तरीही मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मासेमारी सुरू असून पारंपरिक मच्छीमारांना मासळी मिळणे कठीण झाले आहे.”
अलीकडील काही दिवसांपासून वादळाचा इशारा असल्याने पारंपरिक मच्छीमारांची नौका बंदरातच होती. या काळात मात्र एलईडी व मिनी पर्ससिन मासेमारी वाढल्याने पारंपरिक मच्छीमार अडचणीत सापडले आहेत.
शिष्टमंडळाने सांगितले की, “कर्ला, राजीवडा, मिरकरवाडा, जयगड आणि नाटे आदी किनारपट्टीवर बेकायदेशीर मासेमारी उघडपणे सुरू आहे. सुरक्षा रक्षक व परवानाअधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. किनाऱ्यावरच क्रेनद्वारे जनरेटर बोटीवर चढवले जाते, एवढी मोठी क्रेन प्रशासनाला दिसत नाही का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
संघाचा आरोप आहे की काही सुरक्षा रक्षक व अधिकारी बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांकडून लाभ घेत आहेत. “चार मासे मिळावेत म्हणून कर्तव्य बासनात गुंडाळले गेले आहे,” अशी टीका भाटकर यांनी केली.
मच्छीमारांनी पुढे सांगितले की, “आमच्या नौका दहा वावाच्या आत गेल्या की मत्स्य खात्याच्या ड्रोन कॅमेऱ्यांना दिसतात. मग पाच वावाच्या आत पर्ससिन मासेमारी करणाऱ्या नौका कशा दिसत नाहीत? याचा अर्थ जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.” या पार्श्वभूमीवर शाश्वत मच्छीमार हक्क संघाने बेकायदेशीर मासेमारी तातडीने थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
दरम्यान, प्रभारी सहाय्यक मत्स्य अधिकारी स. वि. कासेकर यांनी सांगितले की, “संघाच्या शिष्टमंडळाचा बेकायदेशीर एलईडी, पर्ससिननेट आणि मिनी पर्ससिननेट मासेमारीबाबत आक्षेप आम्ही नोंदवला असून या संदर्भात लवकरच कठोर कारवाई केली जाईल.”

