(नवी दिल्ली)
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय रेल्वेने एक नवा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला असून, पुढील वर्षी जानेवारीपासून प्रवाशांना त्यांच्या कन्फर्म तिकीटाची प्रवास तारीख ऑनलाइन बदलण्याची सुविधा मोफत मिळणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. या नव्या सुविधेमध्ये तिकीट रद्द केल्यावर आकारले जाणारे शुल्क पूर्णपणे रद्द केले जाणार आहे. मात्र, सीट मिळण्याची निश्चित हमी नसणार, तसेच तिकीटाची किंमत वाढल्यास प्रवाशांना किंमतीतील फरक भरावा लागेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या, प्रवासाचा बेत बदलल्यास प्रवाशांना तिकीट रद्द करून नवीन तिकीट बुक करावे लागते, ज्यामध्ये रद्द शुल्क कापले जाते आणि पुन्हा कन्फर्म तिकीट मिळेलच याची खात्री नसते.
नवीन प्रणालीमुळे आता प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. उदाहरणार्थ, तुमच्याकडे २० नोव्हेंबर रोजी मुंबईहून पुण्याला जाण्याचे कन्फर्म तिकीट असेल, आणि तुम्हाला प्रवास २५ नोव्हेंबर रोजी करायचा असेल, तर तुम्ही तेच तिकीट ऑनलाइन बदलून नवीन तारखेला प्रवासासाठी वापरू शकणार आहात. अशा प्रवाश्यांसाठी प्राधान्याने तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे, मात्र याबाबत कोणतीही शाश्वती दिली जाणार नाही.
या बदलामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असून, रेल्वे प्रवास आणखी सोयीस्कर होणार आहे.

