(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर हे तालुक्याचे ठिकाण तसेच मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) चे एक महत्त्वाचे मध्यवर्ती बस्थानक आहे. येथील नव्याने उभारण्यात आलेल्या एसटी बसस्थानकाच्या विकासकामांचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला असला, तरी लोकार्पणाच्या मुहूर्ताची प्रतीक्षा असल्याने या स्थानकाचे औपचारिक उद्घाटन अद्याप झालेले नाही.
मात्र, स्थानकाचे लोकार्पण झाले नसतानाही प्रवासी वाहतूक, सवलत पास कक्ष, तसेच प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था सुरु आहे. या नव्या स्थानकातून दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांचे आगमन आणि प्रस्थान होत असूनही, प्रवाशांच्या मूलभूत सोयीसुविधा अपुऱ्या असल्याने नाराजी वाढली आहे.
उपहारगृह कुलूपबंद; प्रवाशांचे हाल
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर हे प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे जवळच्या तसेच लांब पल्ल्याच्या सर्व एसटी गाड्या थांबतात आणि नंतर पुढील ठिकाणी मार्गस्थ होतात. त्यामुळे येथे दिवसा आणि रात्रीही प्रवाशांची वर्दळ असते.
मात्र, नव्याने उभारण्यात आलेल्या या बसस्थानकात असलेले उपहारगृह अनेक दिवसांपासून कुलूपबंद आहे. त्यामुळे रात्री उशिरा, पहाटे किंवा सकाळच्या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चहा, नाश्ता किंवा अल्पोपहाराची कोणतीही सुविधा येथे उपलब्ध नाही.
स्थानकाच्या आसपासही हॉटेल्स नसल्याने, विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासानंतर थकलेल्या प्रवाशांना जेवण किंवा चहासाठी दूरवर जावे लागते. काहींना तर पुढील गाडी पकडण्यासाठी वेळेअभावी काहीही न खाता प्रवास करावा लागतो. या परिस्थितीमुळे प्रवाशांचे हाल होत असून, याबाबत एसटी प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
“डोळेझाक नेमकी कोण करतंय?” — प्रवाशांचा सवाल
स्थानकाबाहेर काही स्थानिकांनी चहा–नाश्त्याची दुकाने स्वतःच्या सवडीनुसार सुरू केली आहेत, मात्र तीदेखील उभ्याउभ्याच खाण्यापिण्यापुरती मर्यादित आहेत. व्यवस्थित जेवणाची सोय कुठेच नाही. “जर एसटीचे उपहारगृह सुरु झाले असते, तर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असता,” असे अनेक प्रवासी सांगतात. नुकत्याच झालेल्या तालुक्याच्या आमसभेतही या विषयावर चर्चा झाली होती. त्या वेळी अधिकाऱ्यांनी केवळ थातूरमातूर उत्तर देऊन विषयावर पडदा टाकला, असा आरोप स्थानिक नागरिक आणि प्रवासी करत आहेत.
“कित्येक दिवसांपासून उपहारगृह बंद आहे, तरीही याकडे कोणी लक्ष देत नाही. नेमकं या डोळेझाकीमागे कोण आहे?” असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
हिरकणी कक्षही कुलूपबंद; स्तनदा मातांची मोठी गैरसोय
प्रवासी महिलांच्या विशेषतः स्तनदा मातांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी स्थानकात हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. मात्र हा कक्षही कायम कुलूपबंद ठेवण्यात आला आहे.
यामुळे लहान बाळांना स्तनपान देताना मातांना सार्वजनिक ठिकाणीच अडचणीचा सामना करावा लागतो. स्थानकातील प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या, पण उत्तर मात्र नेहमीच एकच — “हा आमच्या अधिकारातला विषय नाही.”
ही भूमिका अत्यंत असंवेदनशील असल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे. “लेकुरवाळ्या मातांना हिरकणी कक्षात थोडा तरी विश्रांतीचा व स्तनपानाचा सुरक्षित कोपरा मिळावा,” अशी मागणी प्रवासी महिलांनी केली आहे.
प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात; प्रवाशांची मागणी
संगमेश्वर बसस्थानकाच्या लोकार्पण सोहळ्याचा मुहूर्त पाहण्यात अर्थ नाही. प्रवाशांना तातडीने सोयी मिळणे हेच सर्वात मोठे लोकार्पण ठरेल. त्यामुळे हिरकणी कक्ष तत्काळ उघडण्यात यावा आणि उपहारगृह सुरु करावे, अशी प्रवासी वर्गातून जोरदार मागणी होत आहे.
संगमेश्वरसारख्या महत्त्वाच्या स्थानकावर प्रवाशांना चहा–नाश्ता, विश्रांती, आणि सुरक्षिततेच्या मूलभूत सुविधा मिळाव्यात, हीच सर्वांची अपेक्षा आहे. एसटी प्रशासनाने आता तरी मुहूर्त न पाहता प्रवाशांच्या अडचणींवर त्वरित मार्ग काढावा, अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांकडून होत आहे. “एसटी प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही, तर संताप उफाळून येईल. याला स्थानक प्रमुख आणि आगार व्यवस्थापकच जबाबदार राहतील”, असा इशारा प्रवासी वर्गाने दिला आहे.

