(रत्नागिरी)
र. ए. सोसायटीच्या अभ्यंकर – कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे यंदाचे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त महाविद्यालयात माजी विद्यार्थी आणि यशस्वी उद्योजक श्री अनिल तोरगलकर यांचा ‘कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांशी संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर श्री अनिल तोरगलकर, र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सहकार्यवाह प्रा.श्री श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. श्री मकरंद साखळकर, उपप्राचार्य श्री सुनील गोसावी हे मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर – कुलकर्णी महाविद्यालयाची स्थापना १९७६ साली झाली. या महाविद्यालयाने अनेक वर्षांपासून अनेक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवले आहे. या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात नेहमीच यश मिळवतात. यापैकी एक माजी विद्यार्थी आणि अमेरिकास्थित उद्योजक श्री अनिल तोरगलकर हे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी महाविद्यालयात आले होते.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, “विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवले पाहिजेत. फक्त पुस्तकामुळे शिक्षण पूर्ण होत नाही अनुभवातून ते पूर्ण होऊ शकते; यासाठी डोळे, कान उघडे ठेवून आजूबाजूचे आपण नीट निरीक्षण केले पाहिजे आणि त्या निरीक्षणाचा वापर जीवनात केला पाहिजे. बदलत्या जगाशी समायोजन साधलं पाहिजे. बोललो की अनेक प्रश्न सुटतात त्यामुळे संवाद साधा.” तसेच त्यांनी यावेळी विविध नवीन विषय आणि उपक्रम सुचवले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या, श्री तोरगलकरांसारख्या अनेक दानशूर व्यक्तींच्या प्रेरणेतून अनेक मोठी कार्य संपन्न होतात. ज्या व्यक्ती चांगले श्रोते असतात तेच शिकतात मोठे होतात. विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वृत्ती वाढवली पाहिजे.
या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालय गीताने झाली. आजीव सभासद मंडळ सचिव श्री.महेश नाईक यांनी प्रमुख पाहुण्यांचा विस्तृत परिचय करून दिला. या कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक उपस्थित होते व संस्था पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. सुप्रिया टोळ्ये तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा. श्री सुनील गोसावी यांनी केले. माननीय प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

