(मुंबई)
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे आणि नाशिक या महापालिकांच्या निवडणुका शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एकत्र लढाव्यात, याबाबत दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक एकमत झाल्याचे शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
राऊत म्हणाले की, “मुंबईसह राज्यातील काही महापालिकांमध्ये मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. कुठे, कोणत्या पक्षाची मदत घेता येईल, यावर चर्चा सुरू आहे.” मात्र, मनसेच्या नेत्यांनी या घडामोडींविषयी “आम्हाला कोणतीही अधिकृत माहिती नाही” असे स्पष्ट केले आहे.
उद्धव–राज ठाकरे भेटीनंतर राजकीय हालचालींना वेग
रविवारी एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. त्यानंतर दुपारी राज ठाकरे मातोश्रीवर गेले. या भेटीबाबत विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “ही भेट राजकीयच होती आणि दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली. मात्र, त्या चर्चेतील तपशील सध्या उघड करता येणार नाही.” राऊत यांनी पुढे सांगितले, “उद्धव आणि राज ठाकरे यांचे वैयक्तिक आणि राजकीय नाते आता अधिकजवळ आले आहे. कितीही प्रयत्न झाले तरी हे नाते आता मागे येणार नाही. ठाकरे बंधू एकत्र राहणार, अशीच आता भूमिका दिसत आहे.”
महापालिका निवडणुका आणि युतीचे समीकरण
राज्यातील २७ महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन दोन्ही पक्षांचे नेते स्थानिक पातळीवर चर्चेच्या अंतिम टप्प्यावर आहेत, असेही राऊत यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक शहराची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक महापालिकेसाठी स्वतंत्र चर्चा आणि रणनीती आखली जात आहे. महाविकास आघाडीचे दरवाजे राज ठाकरे यांच्यासाठी खुले ठेवायचे की नाही, याचा निर्णय एकट्या शिवसेनेचा नाही, कारण ही आघाडी तीन पक्षांची आहे. मनसे हा स्वतंत्र बाण्याचा पक्ष आहे, मात्र सध्या शिवसेना (ठाकरे) आणि मनसे यांच्यात संवाद सुरू आहे. आघाडीतील नेते आणि राज ठाकरे यांचे संबंधही चांगले आहेत, असे ते म्हणाले.
मुंबईचा महापौर ठाकरे बंधूचाच असेल
मुंबईचा महापौर हा मराठी आणि मराठी बाण्याचा होईल, तो अस्सल भगव्या रक्ताचा असेल, म्हणजेच ठाकरे बंधूचाच महापौर होईल असे राऊत यांनी सांगितले. मराठी बाण्याचे म्हणजे भाजप किंवा मिंधे सांगतात तसे नाहीत. दिल्लीचे जोडे उचलणारा माणूस मुंबईचा महापौर होणार नाही. हुतात्मा चौकात जाऊन आमच्या १०५ हुतात्म्यांसमोर दंडवत घालेल आणि महाराष्ट्राची गर्जना करेल त्यांचाच महापौर होईल असेही राऊत म्हणाले.

