(मुंबई)
“उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्ट्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का?” असा थेट सवाल माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उपस्थित केला. नेस्को एग्झिबिशन सेंटर येथे गुरुवारी पार पडलेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते.
कदम म्हणाले, “उद्धव ठाकरेंना फक्त मुख्यमंत्रिपदाचा हव्यास होता. म्हणूनच त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना तिलांजली देऊन त्यांनी शिवसेना सोनिया गांधींच्या पायाशी ठेवली. पण, बाळासाहेबांचे विचार आम्ही खाली पडू देणार नाही. ते पुढे नेण्याची भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली आहे, म्हणूनच आज शिवसैनिक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.”
त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोपांची सरबत्ती करताना म्हटलं, “शिवसेनाप्रमुखांचे निधन नेमके कधी झाले? त्यांची बॉडी दोन दिवस मातोश्रीत का ठेवली होती? त्या काळात आत काय सुरू होतं? आम्ही आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर होतो, आम्हाला सगळं दिसत होतं. बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले गेले? त्यांच्या मृत्युपत्रावर नेमके कोणी सही केली? ही चौकशी झाली पाहिजे.”
कदम यांचा आरोप एवढ्यावरच थांबला नाही. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेना कमजोर करण्याचा आणि मराठी माणसाच्या हिताचे नुकसान केल्याचा ठपका ठेवला. “३० वर्षे मुंबई महापालिका तुमच्या हातात होती. पण मराठी माणूस गिरगाव-लालबागेतून हुसकावला गेला. उंच इमारती बांधल्या पण एकाही मराठी माणसाला घर नाही. हे पाप कोणी केलं? उद्धव ठाकरेंनी,” असा रोखठोक आरोप कदमांनी केला.
तसेच, ठाकरे गटाने पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावलल्याचा आरोप करत त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं, “शिवसेना आम्ही मोठी केली, तुरुंग आम्ही भोगले, लाठ्या आम्ही खाल्ल्या. पण बाळासाहेबांच्या निधनानंतर मनोहर जोशी, गजानन कीर्तिकर, दिवाकर रावते, मी स्वतः आणि आता शिंदे यांनाही संपवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाने केला. एकनाथ शिंदे यांच्या पाठिमागे लागलाय… नेमके तुम्हाला काय हवे होते? बाळासाहेब होते तोपर्यंत माझे शिवाजी पार्क येथे भाषण व्हायचे. बाळासाहेब गेल्यानंतर शिवाजी पार्कवरील माझे भाषण बंद झाले. तुम्हाला कसली भीती वाटत होती?” असा सवाल कदमांनी उद्धव ठाकरेंना विचारला.”
शेवटी, आपल्या भाषणात कदमांनी शिंदे गटाच्या शिवसैनिकांना आवाहन केले, “उद्याची लढाई मराठी माणसाच्या अस्मितेची आहे. भगव्या झेंड्याला तेज देण्यासाठी हे युद्ध आहे. कुणीही निष्काळजी, गाफील राहता कामा नये.”
दरम्यान, मेळाव्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना रामदास कदम म्हणाले, “मी आज मेळाव्यात जे काही बोललो ती माहिती मला स्वतः बाळासाहेब ठाकरे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून मिळाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही त्यांचा मृतदेह मातोश्रीवर ठेवण्यात आला होता, अशी माहिती त्या डॉक्टरांनीच दिली. हे का करण्यात आलं, याबाबत मला काही सांगता येणार नाही, ते त्यांनाच ठाऊक. याचं उत्तर उद्धव ठाकरेंनीच द्यायला हवं.”
ते पुढे म्हणाले, “मातोश्रीवर बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, मात्र ते कशासाठी याचा खुलासा झालेला नाही. मला आज या गोष्टी लोकांसमोर आणाव्याशा वाटल्या म्हणून मी बोललो. ही फक्त झलक आहे, अजून बरंच काही उघड करायचं बाकी आहे. उद्धव ठाकरे आमच्यावर, विशेषतः माझ्या मुलावर अकारण टार्गेट करत असतील, तर मग त्यांच्याबद्दलच्या गोष्टी लोकांसमोर मांडायला मला अडचण काय? डॉक्टरांनी जर मला काही सांगितलं असेल, तर ते सत्य मांडणं माझं कर्तव्य आहे.”
रामदास कदम यांनी इशारा देत पुढे म्हटलं, “मी आत्तापर्यंत फारसं काही बोललो नाही. अजूनही अनेक गोष्टी उघड करायच्या आहेत. कितीवेळा तुम्ही (उद्धव ठाकरे) बॅगा घेऊन मातोश्री सोडून जाणार होतात, हे सगळं मला ठाऊक आहे. मी सूडभावनेने वागत नाही, उलट सूडभावनेने तेच वागत आहेत.”

