(मुंबई)
“बळीराजा संकटात आहे, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्यांची जमीन, पशुधन वाहून गेले आहे. अशा परिस्थितीत आपण त्यांना मदतीचा हात द्यायला हवा. जिथे संकट, तिथे शिवसेना,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गोरेगाव येथील नेस्को मैदानात आयोजित शिवसेना (शिंदे गट) च्या दसरा मेळाव्यात सांगितले.
शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे यांचा मंत्र आठवून सांगितले की, “आम्ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या तत्वावर चालणार आहोत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; त्यांना मदत वेळेत पोहोचवू,” असे आश्वासन त्यांनी दिले. आपल्या २०२२ मधील बंडखोरीचा उल्लेख करत त्यांनी म्हटले, “आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता. बाळासाहेब असते तर त्यांनीही आमच्या शिवसैनिकांची पाठ थोपटली असती,” या विधानातून त्यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
महापुरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचा निर्धार व्यक्त करत, शिंदेंनी सांगितले, “आपल्या शेतकऱ्यांना अन्नधान्य, पाणी, जीवनावश्यक वस्तू आणि जनावरांना चारा देण्याचे काम आपण करत आहोत. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये; त्यांचे जीवन उभारी देण्याचे काम शिवसेनेनेच करायचे आहे.”
मेळाव्यात शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली १५ ट्रकद्वारे पूरग्रस्तांना मदत पाठविण्यात आली. त्यांनी व्यासपीठावर भाषण सुरु करताना कोणताही सत्कार न स्वीकारता थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. एकनाथ शिंदेंनी शिवसैनिकांचे कौतुक करत म्हटले, “संकट काळात शिवसैनिक घरी बसत नाहीत; ते लोकांच्या दारी जाऊन मदत करतात. मराठवाड्यातील नागरिकांच्या घरात जाऊन घर साफ करणे, दरवाज्यावर तोरण लावणे, रांगोळी काढणे अशा शिवसैनिकांचा मला अभिमान आहे. मी वर्क फ्रॉम होम करणारा नाही; मी ग्राउंडवर उतरून काम करणारा शिवसैनिक आहे. बाळासाहेबांनी आम्हाला हेच शिकवले आहे.”
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित मेळाव्यात शिंदेंनी महापुराचे सावट असल्याचे नमूद केले आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शिवसेना सर्व ठिकाणी उभे राहणार असल्याचे ठामपणे सांगितले. “जिथे आपत्ती, तिथे शिवसेना धावून जाते. मी स्वतः, तुमचा एकनाथ शिंदे, संकटाच्या ठिकाणी पोहोचल्याशिवाय राहणार नाही,” असे त्यांनी ठासून सांगितले.
उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर…
उद्धव ठाकरेंनी पुरग्रस्तांना वाटलेल्या मदतीच्या पाकिटांवर एकनाथ शिंदेंचा फोटो असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें म्हणाले, “शिवसेना आज खरी अर्थाने बाधितांचे अश्रू पुसण्याचे काम करत आहे. विरोधकांना फक्त आमचे फोटो दिसतात, पण त्या फोटोच्या आतल्या वस्तू दिसत नाहीत. आम्ही २६ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू पुरग्रस्तांना दिल्या आहेत – गहू, तांदूळ, दाळ, साखर, साड्या, ब्लँकेट्स – आमच्या लाडक्या बहिणींपर्यंत सर्व काही पोहोचवले आहे. तुम्ही एक बिस्कीटचा पुडा तरी घेऊन गेलात का? त्या इतकाही मदतीचा पुरवठा करायला हवे होता, पण तुम्ही काय दाखवलं?”
एकनाथ शिंदेंनी पुढे स्पष्ट केले, “आपल्या फोटोचा उपयोग करून आमचे कार्यकर्ते जल-आपत्तीवेळी मदतीसाठी गेले होते, तेव्हा बरं वाटत होतं. पण आता त्यावर इतकी टीका का? फोटोग्राफरला काय दिसणार? फोटोच दिसतो. काही लोक तर नौटंकी करून आले. पण आम्ही मदत पाठविण्यापूर्वीच पहिला ट्रक गेला आणि त्यानंतर मी स्वतः पोहोचलो. ही आमची पद्धत आहे.”
शिंदेंनी पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहिम, डॉक्टरांची पाठवणूक आणि साथीच्या आजारांचा धोका टाळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करत म्हटले, “काही लोक फक्त हात हालवत, तोंड वाजवत परत आले. तुम्हाला काय अधिकार आहे? त्यांच्या दौऱ्याचा उद्देश स्वतःसाठी फक्त काजू-बदाम, पाणी यांच्यावर मर्यादित राहिला, आणि थोड्या सर्दी-जुकामाने ते परतले. वास्तविक मदत ही अशी नसते,” असेही शिंदेंने सांगितले.

