(मुंबई)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आज दसऱ्याच्या शुभदिनीच कोकणातून मोठा धक्का बसला आहे. सिंधुदुर्गचे माजी आमदार आणि ठाकरेंचे एकनिष्ठ समजले जाणारे राजन तेली यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील नेस्को येथे झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात त्यांनी अधिकृत प्रवेश केला. सिंधुदुर्गातील कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांचा या प्रवेशामध्ये मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे.
राजन तेली हे 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाले होते. मात्र सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी राजकीय वळण घेत शिंदे गटाची वाट धरली आहे.
कोकण हा एकेकाळी शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला मानला जायचा. मात्र गेल्या काही वर्षांत उद्धव ठाकरे गटाला या भागात सातत्याने धक्के बसत आहेत. अनेक महत्त्वाचे नेते शिंदे यांच्या गटात दाखल झाले आहेत. आता दसऱ्याच्या दिवशी झालेल्या तेली यांच्या पक्षांतराने ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी राजकीय समीकरणे बदलणाऱ्या ठरू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कोण आहेत राजन तेली?
राजन तेली यांचा जन्म 25 जून 1970 रोजी कुडाळ तालुक्यातील घोडगे येथे झाला. विद्यार्थी संघटनांपासून ते जिल्हा राजकारणापर्यंत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे.
- 1985 : कणकवली महाविद्यालयात विद्यार्थी सेनेचे प्रतिनिधित्व
- 1988 : शिवसेना शाखाप्रमुख, कणकवली
- 1991 : शिवसेना जिल्हाप्रमुख, सिंधुदुर्ग
- 1995 : जिल्हा परिषद अध्यक्ष, सिंधुदुर्ग
- 1997 : उपाध्यक्ष, कोकण सिंचन महामंडळ
- 2005 : नारायण राणेंसमवेत काँग्रेसमध्ये प्रवेश
- 2007 : विधान परिषद आमदार
- 2012 : चेअरमन, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक
- 2016 : राज्य सचिव, भाजप
- 2020 : जिल्हाध्यक्ष, भाजप सिंधुदुर्ग
- 2014 : भाजप उमेदवार, विधानसभा (पराभव – दीपक केसरकर)
- 2019 : अपक्ष उमेदवार, विधानसभा (पराभव)
- 2024 : भाजप सोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश
आता, आजच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर तेली यांनी शिंदे गटात प्रवेश करून ठाकरे गटाला आणखी कोकणात एक मोठा राजकीय धक्का दिला आहे.

