(नागपूर)
आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा नागपुरातील रेशमबाग मैदानात भव्यदिव्य स्वरूपात पार पडला. यंदाचा मेळावा विशेष ठरला कारण आरएसएस आपले स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करत आहे. संघाची स्थापना १९२५ मध्ये विजयादशमीच्या दिवशी झाली होती.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पारंपरिक शस्त्रपूजन विधी पार पडला.
मेळाव्यासाठी परदेशातूनही मान्यवर सहभागी झाले होते. घाना, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, थायलंड, युनायटेड किंगडम व अमेरिका यांसह विविध देशांतील पाहुण्यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली.
भागवत यांचा स्वदेशीचा संदेश
सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्के टॅरिफचा संदर्भ घेत आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीच्या संकल्पनेवर भर दिला. ते म्हणाले, “नुकत्याच अमेरिकेने जाहीर केलेल्या धोरणामुळे इतर देशांना त्रास सहन करावा लागत आहे. जगाचा गाडा परस्पर संबंधांमधूनच चालतो, मात्र आपले अवलंबित्व नाईलाजापोटी असू नये. त्यामुळे स्वदेशी व स्वावलंबन हाच पर्याय आहे. आपल्याला स्वावलंबी व्हावे लागेल. आंतरराष्ट्रीय संबंध आवश्यक आहेत, पण ते सक्तीने नव्हे तर आपल्या इच्छेने असावेत.”
भागवत यांनी भारतीय तरुण उद्योजकांचे कौतुक करताना सांगितले की, “देशाच्या प्रगतीत त्यांचा जोश व उत्साह महत्त्वाचा आहे. परंतु प्रचलित विकास पद्धतीमुळे श्रीमंत-गरीब दरी वाढते, पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि अमानवीयता वाढते. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणारा विकास मॉडेल आवश्यक आहे.”

