(रत्नागिरी /प्रतिनिधी )
कर्जाच्या ओझ्याला कंटाळून आईचा गळा चिरून निर्घृण खून करणाऱ्या मुलाला अखेर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अनिकेत शशिकांत तेली (वय २५, रा. भवानी मंडपजवळ, शांतीनगर, रत्नागिरी) असे या संशयित आरोपी असलेल्या मुलाचे नाव आहे. तर मृत्यू झालेल्या आईचे नाव पूजा शशिकांत तेली (वय ४५) असे आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की, कुटुंबावर वडिलांनी घेतलेल्या कर्जाचे मोठे ओझे होते. त्यात स्वतःची बेरोजगारी आणि वाढत्या आर्थिक समस्यांना कंटाळून अनिकेतने २६ ऑगस्ट रोजी पहाटे घरातच भीषण कृत्य केले. आई झोपेत असताना त्याने धारदार सुर्याने तिचा गळा चिरला आणि जागीच तिचा मृत्यू झाला. या थरारानंतर त्याने स्वतःच्या दोन्ही हातांच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
गंभीर जखमी अवस्थेत त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल १९ दिवस उपचार घेतल्यानंतर त्याला बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्याच वेळी पोलिसांनी त्याला अटक केली. शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

