“शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो, तर तो एक समाज घडवणारा शिल्पकार असतो.” ह्या उक्ती प्रत्यक्षात अनुभव येणारे शिक्षकी व्यक्तिमत्त्व म्हणजे तृप्ती काताळे. आपल्या कर्मयोगाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणाऱ्या आणि शिक्षणात नवे आदर्श उभे करणाऱ्या तृप्ती काताळे मॅडम म्हणजे ज्ञान, सेवा, आणि समर्पण यांचे मूर्तिमंत उदाहरण आहेत.
काताळे मॅडम यांनी आपल्या शिक्षकी जीवनाची सुरुवात रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात 31 जानेवारी 2004 रोजी केली. शिक्षक ही केवळ नोकरी नसून ती एक सामाजिक जबाबदारी आहे, ही भावना त्यांनी सुरुवातीपासूनच मनाशी बाळगली.
नऊ वर्षे रायगड जिल्ह्यात सेवा करून त्यांनी खेड तालुक्यात बदलीने येऊन 24 जून 2013 रोजी जिल्हा परिषद शाळा भडगाव-उसरेवाडी येथे हजेरी लावली. त्यांचे माहेर आणि सासर या दोन्ही ठिकाणचा संबंध खेड तालुक्याशी असल्यामुळे त्यांना येथील भाषा, लोकजीवन, संस्कृती समजायला फारसा वेळ लागला नाही. त्यांनी अल्पावधीतच गाव व शाळेशी भावनिक नाते जोडले. भडगाव-उसरेवाडी शाळेतील 12 वर्षांच्या कार्यकाळात काताळे मॅडम यांनी ज्या जिद्दीने, सातत्याने आणि तळमळीने काम केले, त्याचा परीघ केवळ वर्गखोलीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण गावाला व्यापून गेला.
शाळा सेमी इंग्रजी होण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. सेमी इंग्रजीच्या अमलातून शाळेचा पट वाढला आणि आसपासच्या खाजगी शाळांना थेट स्पर्धा निर्माण झाली. पालकांचा विश्वास वाढला आणि सरकारी शाळेप्रती असलेला पूर्वग्रह हळूहळू दूर झाला. शाळेचा विकास हे केवळ भौतिक स्वरूपात मर्यादित न ठेवता, काताळे मॅडम यांनी डिजिटल शिक्षण, वर्गसजावट, रंगरंगोटी, स्वच्छता, संगणक साधनसंपत्ती अशा सर्वच अंगांनी शाळेचा कायापालट केला. गावातील दानशूर व्यक्तींना सहभागी करून शाळेला आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सज्ज केले.
काताळे मॅडम यांची अध्यापनशैली ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या केंद्रस्थानी राहिलेली आहे. त्यांच्या वर्गात ज्ञान दिले जाते, पण त्याचबरोबर मूल्यंही रुजवली जातात. विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देणारे प्रश्न, जीवनात मार्गदर्शन करणारे उपक्रम, आणि आत्मविश्वास निर्माण करणारा संवाद, हे त्यांच्या शिकवण्याचे ठळक विशेष. त्यांनी केवळ शैक्षणिक परीणाम सुधारण्यावर लक्ष दिले नाही, तर विद्यार्थ्यांचा भावनिक, सामाजिक आणि शारीरिक विकास व्हावा, यासाठीही कटाक्ष ठेवला. खेळ, नृत्य, नाट्य, हस्तकला अशा कलागुणांना वाव देणाऱ्या विविध उपक्रमांची आखणी केली.
काताळे मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश संपादन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी तालुका व जिल्हा स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्येही चमकदार कामगिरी केली.
कोरोना काळात त्यांनी अनेक गरीब कुटुंबांना अन्नधान्य आणि आर्थिक मदतीचा हात दिला. देवघर आदिवासी वाडीत स्वतः जाऊन तेथील गरजू कुटुंबांना किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तर गणेशोत्सव काळात गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत पाण्याच्या बाटल्या, चहा-नाश्ता वाटप उपक्रमाने गावकऱ्यांचे प्रेम आणि वाहवा मिळवली. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे अशा सामाजिक उपक्रमांत त्यांनी आपलेपणाने पुढाकार घेतला.
2013 पासून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या खेड तालुका महिला प्रतिनिधी म्हणून काताळे मॅडम कार्यरत आहेत. या भूमिकेत त्यांनी संघटनेच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेतला. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे त्या शिक्षक समुदायात विश्वासार्ह मार्गदर्शक म्हणून ओळखल्या जातात.
भडगाव उसरेवाडी शाळेत व गावात त्यांचा निरोप सत्कार करण्यात आला, तो केवळ औपचारिक नव्हता तर ती त्यांच्या कार्याची, निष्ठेची, आणि प्रेमाची आठवण होती. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील अश्रू, पालकांच्या कृतज्ञतेचे शब्द, आणि सहकाऱ्यांच्या भावना या सर्वांनीच त्या दिवसाला अविस्मरणीय बनवले.
सध्या तृप्ती मॅडम तिसंगी-नवानगर येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. त्यांच्या पूर्वीच्या कार्यशैलीचा विचार करता, ही शाळाही त्या निश्चितच नव्या उंचीवर जाईल, यात शंका नाही. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
शैलेश केशव पराडकर
प्रवक्ता – शिक्षक समिती, खेड

