(मुंबई)
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आहार योजनेतील अनुदानात मोठी वाढ करण्यात आली आहे. प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांच्या आहारासाठी ७४ पैसे आणि उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांच्या आहारासाठी एक रुपया १२ पैसे दरवाढ करण्यात आली आहे. धान्य, कडधान्यापासून आहार बनविण्यासाठी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी निश्चित केलेल्या आहार खर्चात धान्य, भाजीपाला आणि इंधन या खर्चाचा समावेश होता. प्राथमिक विभागासाठी सहा रुपये १९ पैसे खर्च दिला जाणार आहे. यामध्ये तीन रुपये ८३ पैसे धान्यासाठी तर दोन रुपये ३६ पैसे इंधन आणि भाजीपाला यासाठी दिले जाणार आहेत.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीमधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी पोषण आहार पुरविण्यात येतो. अनेक महिन्यांपासून पोषण आहार पुरवणाऱ्या संस्थांकडून महागाईमुळे दरवाढीची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने नवीन शासन निर्णयानुसार आहार खर्चात दरवाढ मंजूर केली आहे.
उच्च प्राथमिक विभागासाठी नऊ रुपये २९ पैसे खर्च दिला जाणार आहे. यामध्ये पाच रुपये ७५ पैसे धान्यासाठी तर तीन रुपये ५४ पैसे इंधन आणि भाजीपाला यासाठी आहे. १५ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या निर्णयानुसार प्रतिदिन प्रतिलाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी ५.४५ रुपये आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी ८.१७ रुपये याप्रमाणे निश्चित होती. साधारण दोन वर्षांनंतर आताची नवी दरवाढ करण्यात आली. ही दरवाढ १ मार्चपासून लागू होईल.