(मॉस्को)
भारत आणि चीनसोबतचे सहकार्य गुणात्मकदृष्ट्या उच्च पातळीवर नेणे हे रशियाचे उद्दिष्ट असल्याचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून पुतिन आज व उद्या (४-५ डिसेंबर) रोजी होणाऱ्या २३व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी भारत दौऱ्यावर येत आहेत.
मॉस्कोमध्ये झालेल्या गुंतवणूक मंचावर पुतिन म्हणाले, “ऊर्जा, उद्योग, अवकाश, कृषी आणि विविध क्षेत्रातील असंख्य संयुक्त प्रकल्पांच्या माध्यमातून चीन आणि भारताबरोबरचे सहकार्य अधिक मजबूत करणे हा आमचा हेतू आहे. या भागीदारीचा तांत्रिक स्तरही उंचावण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
ते पुढे म्हणाले की, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत आर्थिक विषयांवर त्यांनी संवाद सुरू केला आहे आणि भारत दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्याच विषयांवर सविस्तर चर्चा करण्याचा मानस आहे. विशेषतः भारतीय वस्तूंच्या रशियन बाजारातील आयात वाढवण्यावर चर्चा होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या दौऱ्यात पुतिन शिखर परिषदेत सहभागी होऊन पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय चर्चाही करतील. दरम्यान, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, अतिरिक्त एस-४०० लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीचा मुद्दा चर्चेच्या अजेंड्यावर असू शकतो. “रशियन शस्त्रांचा भारतीय सशस्त्र दलांमध्ये ३६% वाटा आहे आणि हे सहकार्य पुढेही कायम राहील अशी अपेक्षा आहे,” असे पेस्कोव्ह म्हणाले. रशिया भारताला पाचव्या पिढीतील एसयू-५७ स्टेल्थ फायटर जेट मिळवण्याच्या शक्यतेवरही चर्चा करण्यास इच्छुक आहे. “एसयू-५७ हे जगातील सर्वोत्तम विमानांपैकी एक असून हा विषयही चर्चेचा भाग असेल,” असे पेस्कोव्ह यांनी सांगितले. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याचा उल्लेख करताना ते म्हणाले, “ब्रह्मोस क्षेपणास्त्र हा उच्च तंत्रज्ञान सहकार्याचा उत्कृष्ट नमुना आहे. हे केवळ खरेदी-विक्रीचे व्यवहार नसून तांत्रिक देवाणघेवाणीद्वारे सहकार्याच्या उज्ज्वल भविष्यासाठीचे दार उघडणारे उदाहरण आहे.”
याशिवाय, पेस्कोव्ह यांनी भारत–रशिया अणुऊर्जा सहकार्याबाबतही महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. राष्ट्रपतींच्या भेटीदरम्यान अणुभट्टीसंदर्भातील कराराची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. “या तंत्रज्ञानाचा रशियाला व्यापक अनुभव आहे. परस्पर गुंतवणूक आणि संयुक्त प्रकल्पांमुळे दोन्ही देशांचे भविष्यातील ऊर्जा सुरक्षेचे उद्दिष्ट अधिक मजबूत होईल,” असे ते म्हणाले.
कुडनकुलम प्रकल्पाचा उल्लेख करताना ते म्हणाले, “भारतामध्ये शांततापूर्ण अणुउर्जा निर्माण क्षेत्रात आम्ही खोलवर गुंतलेलो आहोत आणि हा महत्त्वाचा प्रकल्प पुढेही वेगाने चालू राहील अशी आम्हाला आशा आहे.”
दिल्लीला पुतिन यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ‘नो-रिस्क झोन’ घोषित करण्यात आले असून संपूर्ण राजधानीत बहुस्तरीय सुरक्षा कवच उभारले गेले आहे. रशियाची 50 हून अधिक सदस्यांची ऍडव्हान्स सिक्युरिटी टीम आधीच दिल्लीमध्ये दाखल झाली असून त्यांनी पुतिन यांच्या ताफ्याचे मार्ग, कार्यक्रम स्थळे आणि एकूण सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला आहे.
भारतीय सुरक्षा दलांचा व्यापक ताफा
पुतिन यांच्या सुरक्षेसाठी अनेक भारतीय यंत्रणा एकत्रितपणे कार्यरत आहेत :
- दिल्ली पोलिस
- केंद्रीय सुरक्षा संस्था
- पॅरामिलिटरी फोर्सेस
- एनएसजी कमांडो
- एसडब्ल्यूएटी टीम
- अँटी-टेरर स्क्वॉड
- क्विक रिअॅक्शन फोर्स
यामुळे संपूर्ण दिल्लीमध्ये तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक सुरक्षा स्तर तयार करण्यात आला आहे.
रशियाकडून पुतिन यांना खास सुरक्षा
पुतिन यांच्यासोबत 50+ उच्च प्रशिक्षित कमांडो त्यांच्या वैयक्तिक सुरक्षा पथकात असणार आहेत. त्यांच्या अन्नपदार्थांपासून ते सुरक्षा उपकरणांपर्यंत सर्व साहित्य रशियातूनच मागवले गेले आहेत. पुतिन यांच्या निवासस्थानी आणि वाहनांवर रशियाने पोर्टेबल सुरक्षा प्रणाली उभारली असून ती भारतीय यंत्रणांच्या समन्वयाने कार्यरत राहणार आहे.
ट्रॅफिक आणि एरिया कंट्रोल ऑपरेशन
ताफ्याच्या मार्गांवर ट्रॅफिक डायव्हर्जन लागू केले जाईल. दिल्ली पोलिसांनी या मार्गांवर आधीच ‘एरिया सॅनिटायझेशन’, तपासणी आणि स्वच्छता पूर्ण केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पुतिन कुठे थांबणार याची माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर
पुतिन यांच्या भेटीत तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा महत्वाची भूमिका बजावणार आहे :
- अँटी-ड्रोन गन्स: कोणत्याही हवाई धोक्याला त्वरित निष्प्रभ करण्यासाठी
- ड्रोन सर्व्हेलन्स: सतत आकाशातून निरीक्षण
- सीसीटीवी + फेस रिकग्निशन सिस्टीम: संशयितांची रिअल-टाइम ओळख
- सिग्नल मॉनिटरिंग: कोणतेही संशयास्पद कम्युनिकेशन शोधण्यासाठी
नुकत्याच घडलेल्या दिल्लीतील स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. संभाव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर संस्था सतत धोक्याची माहिती गोळा करत आहेत. सुरक्षा तज्ज्ञांचे मत आहे की पुतिन यांची सुरक्षा व्यवस्था जगातील सर्वात कठोर आणि अत्याधुनिक मानली जाते. त्यामुळे भारत आणि रशिया यांच्या संयुक्त सुरक्षा नियोजनात कोणतीही त्रुटी राहणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

