(मुंबई)
राज्यात आरोग्य तपासण्या करणाऱ्या खासगी लॅबवर आता सरकारचा अंकुश बसणार आहे. सध्या या लॅबवर कोणतेही नियंत्रण नसल्याने येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात खासगी लॅब नियमनासाठी स्वतंत्र कायदा आणला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
आरोग्य भवनात आयोजित पत्रकार परिषदेत आबिटकर म्हणाले की, राज्यभर पॅथोलॉजी, एक्स-रे, एमआरआय, सीटी स्कॅन यांसारख्या हजारो लॅब कार्यरत आहेत. परंतु त्यातील तपासणी अहवालांमध्ये अनेकदा विसंगती दिसून येते. एकाच रुग्णाचे वेगवेगळ्या लॅबमध्ये वेगळे रिपोर्ट येत असल्याच्या तक्रारी सरकारच्या निदर्शनास आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन कायद्यात चुकीचे अहवाल व अनियमिततेवर दंड आणि कठोर शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच लॅब तपासण्यांचे दर नियंत्रित करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
बोगस औषधांवर कारवाई
रुग्णांना बोगस औषधे मिळू नयेत यासाठी राज्य सरकारने ड्रग डिटेक्शन मशिन खरेदी केली असून त्यासाठी विशेष फ्लाइंग स्कॉड तयार करण्यात येणार आहे. हे पथक जिल्हापरिषद व महापालिकांच्या स्तरावर खरेदी होणाऱ्या औषधांची तपासणी करेल. औषधांची गुणवत्ता कमी आढळल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल, असे आबिटकर यांनी स्पष्ट केले.

