(मुंबई)
यूपीआय (UPI) मुळे व्यवहार जलद, सोपे आणि सुरक्षित झाले आहेत. एका क्लिकवर हजारो रुपयांचा व्यवहार होतो, त्यामुळे रोख पैसे बाळगण्याची चिंता आता संपली आहे. मात्र, आजपासून (१ ऑक्टोबर २०२५) UPI मधील एक महत्त्वाची सुविधा थांबवण्यात आली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने पर्सन-टू-पर्सन (P2P) कलेक्ट रिक्वेस्ट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे ही कलेक्ट रिक्वेस्ट सेवा?
आतापर्यंत तुम्हाला मित्रांकडून पैसे हवे असल्यास, त्यांच्या यूपीआय आयडीवर रिक्वेस्ट पाठवता येत होती. मित्राने ती रिक्वेस्ट स्वीकारली आणि पिन टाकला की रक्कम तुमच्या खात्यात जमा व्हायची. पण आता ही सुविधा सामान्य वापरकर्त्यांसाठी बंद झाली आहे.
का घेण्यात आला हा निर्णय?
NPCI च्या माहितीनुसार, या सुविधेचा गैरवापर वाढला होता. काही फसवणूक करणारे खोट्या कलेक्ट रिक्वेस्ट पाठवून लोकांकडून पैसे उकळत होते. नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठीच NPCI ने हा कठोर निर्णय घेतला आहे.
मर्चंट्ससाठी सुविधा सुरूच
ग्राहकांमधील व्यवहारासाठी ही सेवा बंद झाली असली, तरी मर्चंट्ससाठी ती उपलब्ध राहील. म्हणजेच –
- IRCTC वर तिकीट बुकिंग,
- फ्लिपकार्ट/ॲमेझॉनवर खरेदी,
- नेटफ्लिक्ससारख्या सबस्क्रिप्शनचे पेमेंट
या सर्वांसाठी व्यापारी तुम्हाला पेमेंट रिक्वेस्ट पाठवू शकतील. मात्र, मित्रांसोबत बिल शेअर करण्यासाठी तुम्ही आता रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही.
या बदलाचा परिणाम
- मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून पैसे मागणे आता थेट शक्य होणार नाही.
- दैनंदिन व्यवहार (उदा. डिनरचं बिल शेअर करणं) थोडे कठीण होऊ शकतात.
- मात्र, या निर्णयामुळे फसवणूक मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
कलेक्ट रिक्वेस्ट सुविधा सुरुवातीला व्यवहार सुलभ करण्यासाठी आणली होती. पण सतत वाढणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमुळे ती सामान्यांसाठी बंद करण्यात आली. NPCI चं म्हणणं आहे की, हा निर्णय नागरिकांचे व्यवहार आणखी सुरक्षित करण्यासाठी आवश्यक होता.

