(पाली / वार्ताहर)
प्राथमिक आरोग्य केंद्र खानू अंतर्गत पाली आरोग्य उपकेंद्राच्या वतीने ग्रामपंचायत पाली येथे ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग घेऊन आरोग्य सेवा आणि मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाला पाली सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष धाडवे, माजी सरपंच संदीप गराटे, ग्रामविकास अधिकारी आशिष खोचाडे यांसह वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपशिखा, डॉ. मंगेश पायगव्हाण, आरोग्य निरीक्षक राजेंद्र रणसे, आरोग्य सहाय्यिका पुष्पा शेकदार, मृणाली पवार, समुदाय आरोग्य अधिकारी जान्हवी सावंत आणि सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
शिबिरात ग्रामस्थांची रक्त तपासणी, ईसीजी, बीपी, शुगर, संसर्गजन्य आजार, कॅन्सर तसेच किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी व समुपदेशन करण्यात आले. गरोदर महिलांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. याशिवाय पोषण आहाराविषयी जागृती करण्यात आली.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

