(नागपूर)
राज्याच्या राजकारणातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १९ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी झालेल्या कथित दगडफेक हल्ल्याचे नागपूर ग्रामीण पोलिसांनी ‘बी फायनल’ (क्लोजर) रिपोर्ट न्यायालयात दाखल केले आहे. फॉरेन्सिक तपास आणि पुराव्यांच्या अभावामुळे पोलिसांनी ही घटना फर्जी (बनावट) असल्याचा निष्कर्ष काढला आहे. यामुळे राज्यातील राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.
२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अंतिम दिवशी, अनिल देशमुख मुलगा सलिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघातील प्रचारासाठी नरखेडला गेले होते. परत जाताना बैलफाटा येथे रात्री सुमारे ८ वाजता चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर दगडफेक केली, असा आरोप करण्यात आला होता. हल्ल्यात कारच्या काचा फुटल्या आणि देशमुख यांना डोक्याला इजा झाली होती. त्यांना प्रथम काटोल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करून नंतर नागपूरच्या अलेक्सिस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काटोल आणि नागपूरमध्ये रात्रभर आंदोलने केली, तर सलिल देशमुख यांनी भाजपवर आरोप केला होता की, भाजपला पराभवाची भीती वाटते, म्हणून हा भ्याड हल्ला करण्यात आला. त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्यावर शंका व्यक्त केली होती.
नागपूर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल केला. परंतु फॉरेन्सिक सायन्स लॅब (RFSL) ने तपासात कोणतेही ठोस पुरावे न सापडल्याचे सांगितले. सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळावरील पुराव्यांमध्ये काही तथ्य नाही असे निष्कर्ष निघाले. यानुसार पोलिसांनी न्यायालयात बी फायनल रिपोर्ट दाखल केला असून प्रकरण बंद होण्याची शक्यता आहे.

