(संगमेश्वर / प्रतिनिधी)
साखरपा (ता. संगमेश्वर) येथील भंडारवाडीतील डॉ. सचिन काळगुडे व डॉ. शुभांगी काळगुडे यांच्या लाडक्या पाळीव मांजरी ‘मनोरमा’ने तब्बल साडेचार वर्षांत १४ वेळा ६५ पिल्लांना जन्म दिला आहे. तिची तब्येत ठणठणीत असून, यामुळे परिसरात कौतुकाची एकच चर्चा रंगली आहे.
काळगुडे दांपत्य हे गेली दोन दशके रुग्णसेवा करीत असून, त्याचबरोबर प्राणीमात्रांविषयीही त्यांच्यात जिव्हाळा निर्माण झाला. दहाव्या मे २०२१ रोजी मनोरमाने पहिल्यांदा बाळंतपण केले. त्यानंतरच्या प्रत्येक बाळंतपणाला घरच्यांनी उत्साहाने सामील होऊन काळजी घेतली. सध्या सहा गोंडस पिल्लांना जन्म दिल्यानंतरही ‘मनू’ नावाने ओळखली जाणारी ही मांजर पूर्णपणे स्वस्थ आहे. चिकन, बांगडा, अंडी हा तिचा नेहमीचा आहार असून आठवड्यातून एकदा तिला शाम्पूने आंघोळ घातली जाते. घरात कुठलीही घाण न करता स्वच्छतेने राहण्याची तिची सवय हे वैशिष्ट्य आहे.
रुग्णसेवेसोबतच पाळीव प्राण्यांची मनापासून सेवा कशी करावी, याचे उदाहरण काळगुडे दांपत्याने घालून दिले आहे. आजारपणाच्या काळात घरातील सदस्याजवळ बसून राहणाऱ्या ‘मनू’ने संकटाच्या वेळी कुटुंबाचे रक्षण केल्याची घटना स्वतः डॉ. काळगुडे यांनी सांगितली. मनोरमाचे प्रत्येक बाळंतपणाचे फोटो व व्हिडिओ जतन करून ठेवले असून, “शेवटच्या श्वासापर्यंत या जीवाची काळजी घेणार” अशी भावनिक भावना काळगुडे दांपत्याने व्यक्त केली. या प्राणीप्रेमी कुटुंबाला भडकंबा येथील एसटी चालक प्रल्हाद शिंदे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.

