(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपेक्षित जागा न मिळाल्यास, पक्ष रत्नागिरीत स्वबळावर लढण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेईल, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांनी सोमवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
रत्नागिरीतील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत कीर म्हणाले, संविधानाच्या संरक्षणासाठी कार्यकर्त्यांची एकजूट निर्माण करणे, त्यांना मार्गदर्शन देणे आणि निवडणुकीसाठी तयारी करणे हेच कार्यकर्ता प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. सध्या कार्यकर्त्यांची मानसिकता वेगळी आहे, त्यामुळे त्यांच्या मते जाणून घेणे अत्यावश्यक आहे, असेही ते म्हणाले.
महापुराने रत्नागिरीसह संपूर्ण राज्यात मोठा फटका दिल्याचा आरोप करत, कीर यांनी राज्य सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप केला. महापुरामुळे जमिनीची धूप झाली असून, लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तरीही सरकार फक्त पंचनाम्यांवर अडकून आहे. लोकांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी तत्काळ मदतीची घोषणा करावी, अशीही त्यांनी मागणी केली.
स्थानिक समस्यांवर बोलताना कीर म्हणाले, स्थानिक प्रश्न अजूनही जसाच्या तसा आहेत. कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचून त्यांची मते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पक्षाने या प्रश्नांवर वेळोवेळी आंदोलन केले आहे, मात्र पालकमंत्र्यांना अन्य विकासकामांमुळे रस्त्यांकडे लक्ष देण्याची वेळ नाही, असे उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
निवडणुकीची रणनीती निश्चित करणार : शशांक बावचकर
कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराबाबत काँग्रेसचे शशांक बावचकर म्हणाले, रत्नागिरीत आयोजित शिबिराचा उद्देश कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देणे हा आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या सूचना व मते विचारात घेतली जातील, आणि त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती निश्चित केली जाईल. रत्नागिरीत काँग्रेसकडून स्थानिक निवडणुकीसाठी सशक्त तयारी सुरू असल्याचे संकेत या शिबिरातून स्पष्ट झाले आहेत.

