( चेन्नई )
आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुमला तिरूपती मंदिर आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वात प्रवेश करणार आहे. लवकरच मंदिरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाने सज्ज कमांड कंट्रोल सेंटर सुरू होणार असून, यामुळे भाविकांची गर्दी नियंत्रणात ठेवणे अधिक प्रभावी आणि सोपे होईल.
तिरूपती मंदिर हे भारतातील पहिले असे मंदिर ठरणार आहे, जिथे एआय-आधारित कमांड कंट्रोल सेंटर कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे या मंदिराला भारताचे पहिले “एआय टेंपल” असेही म्हटले जात आहे.

एआय कंट्रोल सेंटरची वैशिष्ट्ये
इंटीग्रेटेड कमांड सेंटर :
वैकुंठम-१ कॉम्प्लेक्समध्ये हे सेंटर उभारण्यात आले आहे. एका मोठ्या डिजिटल स्क्रीनवर मंदिर परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लाइव्ह फुटेज पाहता येईल.
चेहरा ओळखण्याची क्षमता :
अत्याधुनिक कॅमेरे गर्दीतल्या भाविकांचे चेहरे ओळखू शकतात.
दर्शनासाठी लागणारा वेळ :
हे कॅमेरे रांगेत उभ्या भाविकांची संख्या मोजून दर्शनासाठी लागणाऱ्या वेळेचा अचूक अंदाज देतात.
३डी नकाशे व गर्दीचे विश्लेषण :
प्रणाली ३डी नकाशे तयार करून कोणत्या भागात अधिक गर्दी आहे हे दाखवते आणि गर्दी कमी करण्याचे उपाय सुचवते. डेटाचे विश्लेषण करून कोणत्या वेळेस मंदिरात जास्त गर्दी होईल याचाही अंदाज देते.
चोरी व गैरकृत्यांवर नियंत्रण :
चोरी किंवा इतर संशयास्पद कृत्यांमध्ये सहभागी व्यक्तींना ओळखण्यात मदत करते.
हरवलेल्या व्यक्तींचा शोध :
हरवलेल्या भाविकांना ओळखून त्यांच्या हालचालींचा मागोवा घेते.
भाविकांच्या चेहऱ्यावरील हावभावांचे विश्लेषण :
भाविकांना काही अडचण असल्यास त्यांची ओळख पटवून तातडीने मदत उपलब्ध करून देते.
आपत्कालीन परिस्थितीत मार्गदर्शन :
आणीबाणीच्या प्रसंगी बाहेर पडण्यासाठी सर्वात जवळचा आणि सुरक्षित मार्ग दाखवते.
या एआय सिस्टीममुळे तिरुमला तिरुपती देवस्थानाला भाविकांचे व्यवस्थापन, सुरक्षा आणि सेवा अधिक प्रभावीपणे पार पाडता येणार आहेत. तंत्रज्ञान आणि परंपरेचा संगम साधणारे हे केंद्र भारतातील मंदिर व्यवस्थापनाच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

