(मंडणगड)
देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे यांच्यावतीने स्वस्थ नारी, सशक्त परिवार या विशेष अभियानांतर्गत महिलांसाठी दि. २९ सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महिलांच्या सर्वांगीण आरोग्य संवर्धनासाठी तपासणी, समुपदेशन व जनजागृती करण्यात आली.
शिबिरात महिलांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग, ॲनिमिया आदी आजारांबाबत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गरोदर मातांची तपासणी, मासिक पाळी स्वच्छता, योग्य आहार पद्धती याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत लाभार्थ्यांचे e-KYC नोंदणीही करण्यात आले.
शिबिरात स्त्रीरोग तज्ञ डॉ. व्यास मॅडम व डॉ. आंबेकर मॅडम, बालरोग तज्ञ डॉ. जाधव मॅडम, तसेच नेत्ररोग तज्ज्ञ श्री. पिलणकर यांनी तपासणी करून लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन दिले.
कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रुप ग्रामपंचायत देव्हारेच्या सरपंच सौ. प्रमिला ताई दळवी व उपसरपंच श्री. तुषारजी करावडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. शिबीर यशस्वी होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारेचे वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

