(मंडणगड / वार्ताहर)
राष्ट्रीय महामार्गावरील आंबडवे–लोणंद मार्गावर पालेकोंड–तुळशी दरम्यान १५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास बोलेरो गाडीचा अपघात झाला. स्टीअरिंगचा बॉल जॉइंट तुटल्याने स्टीअरिंग लॉक होऊन गाडी पलटी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात जावळे गावातील आठ प्रवासी जखमी झाले.
जावळे येथून मंडणगडच्या दिशेने येणारी बोलेरो गाडी पाले–तुळशी दरम्यान आली असता अचानक स्टीअरिंगचा बॉल जॉइंट तुटला. त्यामुळे स्टीअरिंग लॉक होऊन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी डाव्या बाजूला कलंडून पलटी झाल्याची माहिती पुढे आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी प्रवाशांना उपचारासाठी मंडणगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना माणगाव आणि मुंबई येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी अपघाताची प्राथमिक माहिती घेतली असून, दुर्घटनेचे नेमके कारण आणि वाहनातील संभाव्य तांत्रिक बिघाड याबाबत अधिक तपास सुरू केला आहे.


