(संगमेश्वर / एजाज पटेल)
करजुवे खाडीपात्रात संक्शन पंपांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून महसूल विभाग यावर कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असून वाळू माफियांना मुक्त संचाराची संधी मिळत आहे.
वाळू उपशाची कोणतीही अधिकृत परवानगी नसतानाही, सात ते आठ संक्शन पंपद्वारे रात्रंदिवस वाळू उपसली जात आहे. एका पंपातून दररोज ३०० ते ४०० ब्रास वाळू उपसली जाते, म्हणजेच एकूण दिवसाला अंदाजे १००० ते २००० ब्रास वाळू खाडीपात्रातून बाहेर काढली जाते.
ही वाळू ओव्हरलोड ट्रकद्वारे वाहून विकली जात असून शासनाच्या आदेशांचे खुलेआम उल्लंघन केले जात आहे. महसूल अधिकाऱ्यांच्या “अर्थपूर्ण” कृपाशिर्वादामुळे या माफियांना अभय मिळत असल्याचे आरोप होत आहेत.
सामान्य नागरिकांना हा सर्व प्रकार स्पष्टपणे दिसत असतानाही महसूल विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. काही प्रतिष्ठित नागरिकांनी महसूल अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असून तोंडी तक्रारीही दाखल केल्या आहेत. मात्र, कारवाईचा फारसा परिणाम दिसून येत नाही, कारण महसूल अधिकाऱ्यांचे वाळू माफियांशी “अर्थपूर्ण” संबंध असल्याची चर्चा स्थानिकांत रंगत आहे.
राजरोसपणे सुरू असलेल्या या तस्करीमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधित महसूल अधिकाऱ्यांची चौकशी करून त्वरित बदली करण्याची जोरदार मागणी होत आहे. शासनाने याची गंभीर दखल घेऊन कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.