(विशेष /प्रतिनिधी )
हातखंबा येथील जीवघेण्या तीव्र उतारावर वारंवार होणाऱ्या अपघातांनंतर आता ठेकेदार ईगल कंपनी व महामार्ग प्राधिकरण विभागाने आता रस्त्यावर मोठे बॅलर ठेवून उपाययोजना केल्याचा केल्या आहेत. वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी रस्त्यावर बॅलर ठेवून त्यांना लाल रंगाच्या रेडियम पट्ट्याही लावण्यात आल्या आहेत.
मात्र, या उपाययोजनेची परिणामकारकता कितपत असेल, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण, जर एखाद्या वाहनाचे ब्रेकच निकामी झाले असतील तर केवळ बॅलरमुळे त्याचा वेग कमी होईल का? हा गंभीर प्रश्न चर्चिला जात आहे. उलट वेगात आलेली वाहने या बॅलरवर आदळून शकतात आणि त्यामुळे आणखी मोठ्या अपघातांचा धोका संभवतो, अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ‘मृत्यूच्या उतारावर’ झालेली ही तात्पुरती उपाययोजना कुचकामी ठरेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नव्या पुलाचे कामकाज अगदी धिम्या गतीने चालू आहे. दुसऱ्या बाजूने हातखंबा तिठापासून ते तीव्र उतारापर्यंत काँक्रीटीकरण मार्गिका तयार करण्यात आली आहे. जुना डांबरीकरणाचा रस्ता देखील बंद केला आहे. ठेकेदार ईगल कंपनीकडून तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या तीव्र उतारामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, या ठिकाणी शाश्वत उपाययोजना करण्याची निकड निर्माण झाली आहे. केवळ तात्पुरत्या साधनांनी अपघात रोखणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे.
उपाय म्हणून, ज्या ठिकाणी हा डेंजर तीव्र उतार तयार करण्यात आला आहे, तेथून पुढे थेट शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत मातीचा भराव टाकून उतार कमी करता येऊ शकतो. मात्र, केवळ माती टाकून तो भराव अपुरा ठरणार आहे. त्या ठिकाणी योग्य रितीने व उच्च दर्जाचा डांबरीकरणाचा पॅच तयार करणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून तीव्र उतारातून वाहनांचा अचानकपणे वेग वाढणार नाही. तसेच दर्जेदार आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम कामामुळेच तीव्र उतारावरून वाहनांचे नियंत्रण सुटण्याचे प्रकार थांबतील आणि अपघातांची मालिका खऱ्या अर्थाने रोखता येईल, असा विश्वास काही वाहनचालकांनी व्यक्त केला आहे.
अनेकदा ट्रक अचानक अडकून पडतात…..
पालीहून हातखंब्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी हा तीव्र (उतार) चढणीचा रस्ता मोठे संकट बनला आहे. या ठिकाणी गंभीर चढणीचा रस्ता असल्याने अनेकदा ट्रक अचानक अडकून पडतात. काहीवेळा वाहने चढणीच्या रस्त्यावर येऊन ताण आल्याने वाहनांचे एक्सेल तुटण्याची वेळही येते. यापूर्वी असे अनेक ट्रक येथे अडकून रहिल्याच्या घटना घडल्या असून, त्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा वारंवार खोळंबा होत असतो. अडकलेले किंवा नादुरुस्त ट्रक रस्त्याच्या कडेला उभे करावे लागतात. मात्र, अशा प्रकारे उभ्या केलेल्या ट्रकांमुळे डेंजर उतारावरून जाणाऱ्या – येणाऱ्या इतर वाहनांनाही अडथळा निर्माण होतो. अपघाताचा धोका दुपटीने वाढतो आणि संपूर्ण उतारच धोक्याचे क्षेत्र बनतो. योग्य रस्ता डिझाइन आणि सुरक्षिततेची शाश्वत उपाययोजना न झाल्यास हा उतार पुढेही अपघातांचे केंद्र ठरू शकतो.
बॅरिगेटिंगने अपघाताचे प्रमाण कमी होईल का?
हातखंबा येथे जिथून तीव्र उतार सुरू होतो, त्याच ठिकाणी योग्य उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. ठेकेदार कंपनीने तयार केलेल्या या उतारामुळेच वारंवार अपघात होत असल्याचे वास्तव आता स्पष्टपणे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी गॅस टँकरने या उतारावर नियंत्रण गमावत थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीत घुसकण केली होती. सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र या प्रकारामुळे भीतीचे सावट अधिक गडद झाले. हा डेंजर तीव्र उतार ते गुरववाडी पर्यंतच्या रस्त्यावर यावर्षी अनेक अपघात झाले आहे. सध्यातरी महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीकडून वाहनांचा वेग कमी होण्यासाठी उतारापुर्वी रस्त्यावर मोठे बॅलर ठेवून बॅरिगेटिंग करून तकलादू उपाय केला जात असला तरी मात्र, यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल का, हा प्रश्न अधिक सतावत आहेत. उलट अशा उथळ उपाययोजनांनी जीविताचा धोका कायम राहील, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

रस्त्याची तातडीने डागडुजी करून दर्जेदार बनवणेही अपरिहार्य
गणेशोत्सवाच्या काळात या उतारावर डांबरीकरणाचा पॅच टाकण्यात आला होता; पण काही दिवसांतच तो पॅच उखडून पडला. रस्त्यावर खडीचे साम्राज्य निर्माण झाले आणि अपघाताचा धोका दुप्पट झाला. इतक्या गंभीर परिस्थितीतही महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसह ठेकेदाराचे दुर्लक्ष का होते? याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. लोकांना नाहक जीव गमवावे लागत असतील, तर याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर व ठेकेदार कंपनीवर निश्चितपणे टाकली पाहिजे आणि मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये, असा ही सवाल उपस्थित केला जात आहे. याशिवाय ठेकेदार कंपनीने या परिसरातील सर्व्हिस रोडची विदारक दशा लक्षात घेऊन तातडीने डागडुजी करून तो दर्जेदार बनवणेही अपरिहार्य असल्याचे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांचे म्हणणे आहे.

