(दुबई)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव करून नवव्यांदा आशिया कप आपल्या नावावर केला. तिलक वर्माने खेळलेल्या नाबाद ६९ धावांच्या लढाऊ खेळीमुळे भारताने पाकिस्तानकडून दिलेले १४७ धावांचे लक्ष्य १९.४ षटकांत गाठले. आशिया कप 2025 मधील हायव्होल्टेज अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केल्याने भारतीय संघाचा क्रिकेट जगतामधील दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.
पाकिस्तानचा डाव कोसळला
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. साहिबझादा फरहान (५७) आणि फखर झमान (४६) यांनी पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी सामन्यावर पकड मजबूत केली. पुढील ३३ धावांत पाकिस्तानने ९ विकेट गमावल्या आणि संपूर्ण संघ १९.१ षटकांत १४६ धावांवर गारद झाला.
भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

भारताची खराब सुरुवात, तिलक ठरला तारणहार
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात डळमळीत झाली. अवघ्या २० धावांवर सलामीवीर अभिषेक शर्मा (५), कर्णधार सूर्यकुमार यादव (१) आणि उपकर्णधार शुभमन गिल (१२) बाद झाले. मात्र तिलक वर्मा आणि संजू सॅमसन (२४) यांनी ५७ धावांची भागीदारी करत डाव सावरला.
सॅमसन बाद झाल्यानंतर तिलकला शिवम दुबेची साथ लाभली. दोघांनी ४० चेंडूत ६० धावांची जोडी जमवली. शेवटच्या षटकात भारताला १० धावांची गरज असताना तिलकने हारिस रौफवर षटकार ठोकत विजय जवळ आणला आणि रिंकू सिंगने चौकार मारत सामना संपवला. पाकिस्तानकडून फहीम अशरफने ३ विकेट्स घेतल्या.
तिसऱ्यांदा भारत-पाक लढत
आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान तिसऱ्यांदा आमनेसामने आले. लीग स्टेज आणि सुपर-४ मध्ये पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारताने अंतिम सामन्यातही सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला.
या विजयासह भारताने २०२३ नंतर सलग दुसरा आशिया कप जिंकला आणि सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावणारा एकमेव संघ ठरला. सूर्यकुमार यादवने पहिल्याच वेळेस कर्णधार म्हणून ट्रॉफी जिंकली. टी-२० आशिया कपमधील एकूण भारत-पाक लढतीत भारताचे वर्चस्व ११-३ असे झाले आहे.

