(नवी मुंबई)
“पतीसाठी पत्नी काहीही करू शकते” याची हृदयस्पर्शी प्रचिती खारघर येथे दिसून आली. रक्तगट न जुळल्याने वर्षभर प्रतिक्षेत असलेल्या दोन रुग्णांच्या पत्नींनी अदलाबदलीतून एकमेकींच्या पतींना यकृत दान करून त्यांचे प्राण वाचवले. खारघर येथील मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरांच्या पथकाने स्वॅप लिव्हर ट्रान्सप्लांटची ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.
काय आहे घटना
चिपळूणमध्ये व्यवसायाने व्यापारी असणारे महेंद्र गमरे (५३) आणि नांदेडचे पवन ठिगळे (४१) या दोघांनाही गंभीर यकृत विकार होता. त्यांच्या पत्नींनी – जुही गमरे (४१) आणि भावना ठिगळे (३८) आपल्या पतीसाठी यकृत दान करण्याची तयारी दर्शवली. मात्र रक्तगट जुळत नसल्याने थेट दान शक्य नव्हते. यानंतर अदलाबदलीच्या पद्धतीने जुही गमरे यांनी पवन ठिगळे यांना तर भावना ठिगळे यांनी महेंद्र गमरे यांना यकृताचा काही भाग दान केला. सलग दहा तासांत या चार मोठ्या शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या. दात्यांना सात दिवसांत आणि रुग्णांना ११ दिवसांत डिस्चार्ज देण्यात आला.
मेडिकव्हर हॉस्पिटल्समधील यशस्वी शस्त्रक्रिया
यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी सर्जरी विभागाचे संचालक डॉ. शरण नरुटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही शस्त्रक्रिया केली. प्रचंड आव्हानात्मक असलेल्या या प्रक्रियेत डॉक्टरांनी कौशल्याने सर्व गुंतागुंती हाताळल्या आणि दोन्ही रुग्णांना नवजीवन दिले.
स्वॅप डोनेशनचा जीवनदायी पर्याय
डॉ. नरुटे यांनी सांगितले की, रक्तगट न जुळल्यामुळे त्यांच्या पत्नींना थेट दान शक्य नव्हते. अशा परिस्थितीत स्वॅप लिव्हर डोनेशन हा एकमेव पर्याय ठरला. योग्य अदलाबदलीनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये रक्तगट जुळला आणि प्रत्यारोपण यशस्वी झाले. अवयवदानाविषयी जागरूकता वाढवण्याचे आवाहन करताना डॉक्टर म्हणाले, अवयव दान हे धाडस आणि दयेचे कृत्य आहे जे रुग्णाला नवजीवन देते. रुग्णांनी इम्युनोसप्रेसेंट औषधे, काटेकोर स्वच्छता आणि मास्कचा वापर या गोष्टी पाळणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दोन धाडसी महिलांच्या या त्यागामुळे त्यांचे पती चांगल्या रीतीने पुन्हा एकदा जीवनाचा श्वास घेऊ शकले आहेत. म्हणूनच त्यांच्या पत्नींना “आधुनिक सावित्री” म्हणून समाजात आदराने गौरवण्यात येत आहे.

