(खेड)
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कोकण प्रांतातील जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अध्यक्षपदी बिजघर (ता. खेड) येथील प्रतिष्ठित व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व श्री. विजय येरुणकर यांची निवड करण्यात आली आहे. सन 2025 ते 2028 या तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली असून ती पूर्णपणे एकमताने झाली आहे.
श्री. विजय येरुणकर यांनी समाजकारण, जनजागृती व ग्राहक हक्क रक्षण या क्षेत्रात सातत्याने काम केले असून त्यांचा व्यापक संपर्क, सकारात्मक दृष्टिकोन व सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती या गुणांमुळे त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीची माहिती मिळताच खेड तालुक्यात विविध ठिकाणी कार्यकर्ते, सामाजिक संघटना व नागरिकांनी अभिनंदन केले. येरुणकर यांच्या नेतृत्वाखाली ग्राहक पंचायतीचे काम अधिक प्रभावी, गतिमान व जनहितकारी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना श्री. येरुणकर म्हणाले की, “ग्राहकांचे प्रश्न, त्यांचे हक्क व त्यांना मिळणाऱ्या सुविधा या बाबींसाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्राहकापर्यंत पंचायतीची भूमिका व मदत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करणार आहे.”
खेड तालुक्यातील नागरिक, व्यापारी, शेतकरी तसेच विविध सामाजिक संस्था यांनी त्यांच्या निवडीचे मनःपूर्वक स्वागत केले असून आगामी काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहक चळवळ नवे पर्व गाठेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

