(देवरुख / प्रतिनिधी )
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय (स्वायत्त), देवरुखच्या वाणिज्य विभागातील प्रा. श्री. सुनिल रत्नाकर सोनावणे यांना मुंबई विद्यापीठाची विद्यावाचस्पती पदवी(पी. एचडी.) नुकतीच प्रदान करण्यात आली आहे.
प्रा. सोनावणे यांनी “ए स्टडी ऑन फायनान्शियल परफॉर्मन्स ऑफ हाऊसिंग फायनान्स कंपनीज इन इंडिया(भारतातील गृहनिर्माण वित्त कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीचा अभ्यास)” या विषयावर आपले संशोधन पूर्ण केले आहे. त्यांनी आपले संशोधन मालाड, मुंबई येथील प्रल्हादराय दालमिया लायन्स कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथून पूर्ण केले. प्रा. सोनावणे यांनी डॉ. श्री. शिवा मोतीराम पदमे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यावाचस्पती(पी.एचडी.) पदवी प्राप्त केली आहे.
प्रा. डॉ. सोनावणे यांच्या संशोधनाचा लाभ गृहनिर्माण वित्त कंपनीच्या गुंतवणूकदार व ग्राहकांना होणार आहे. त्यांनी संशोधनाकरिता सेबीअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या १७ कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीचा अभ्यास केला आहे. प्रा. डॉ. सोनावणे यांनी आपले मार्गदर्शक डॉ. शिवा मोतीराम पदमे, परीक्षक मंडळाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. किनरी ठक्कर, बाह्य परीक्षक डॉ. संगीता जीवनकर यांचे विशेष आभार मानले.
प्रा. डॉ. सोनावणे आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील वाणिज्य विभागात गेली ११ वर्षे कार्यरत असून, त्यांनी या कालावधीत ९ राष्ट्रीय व ७ आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपले शोध निबंध सादर केले आहेत. त्यामधील एका शोधनिबंधाला आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ‘उत्कृष्ट शोधनिबंध सादरीकरण पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. सन २०१७ पासून ते आजपर्यंत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी असून, त्यांना सन २०२२-२३चा ‘जिल्हास्तरीय उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी’ आणि महाविद्यालयाला ‘जिल्हास्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना विभाग पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी प्रा. डॉ. सुनिल सोनावणे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रा. डॉ. सोनावणे यांनी मिळवलेल्या विद्यावाचस्पती पदवीसाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. अरविंद कुलकर्णी, तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो- प्रा. डॉ. सुनील सोनावणे यांना सन्मानित करताना दालमिया कॉलेजचे प्राचार्य डॉ. दिगंबर गंजेवार, प्रा. भाग्यश्री कांबळे, डॉ. शिवा पदमे, डॉ. किरण माने आणि डॉ. अनिल बगाडे.