(संगमेश्वर / एजाज पटेल)
फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी व गलथान कारभाराविरोधात कठोर चौकशी व कारवाईची मागणी करत, डिंगणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मिथुन निकम हे येत्या २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणास बसणार आहेत. त्यांच्या या जनहिताच्या निर्णयाला विविध संघटना, संस्था, ग्रामपंचायतींसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्राद्वारे तसेच संदेशाद्वारे पाठींबा दिला आहे. त्यामुळे या उपोषणाला अधिक तीव्र धार मिळू लागली आहे.
फुणगूस दशक्रोशी परिसरात खासगी वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांना पूर्णपणे प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागते. मात्र, येथे अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित असणे, बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा गायब होणे, तसेच फिरत्या सेवेकडे दुर्लक्ष केल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. अनेकदा केंद्र कुलूपबंद असल्याने तातडीच्या सेवेसाठी आलेल्या रुग्णांना भटकंती करावी लागते.
उपकेंद्रांमध्ये नेमलेले आरोग्य व हिवताप कर्मचारी देखील वारंवार अनुपस्थित राहतात. त्यांच्या मनमानीमुळे गावपातळीवर आरोग्य मार्गदर्शन आणि तपासणी पोहोचत नाही. यामुळे लहान मुलांच्या आरोग्यासह रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे.
या सर्व कारभारावर तालुका व जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने स्थानिकांत तीव्र नाराजी आहे. “जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. मला मिळालेला लोकांचा पाठिंबा हे माझ्या समाजकार्यासाठी बळ आहे,” असे मिथुन निकम यांनी सांगितले.

