(मुंबई)
राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी भाऊबीज भेट जाहीर केली आहे. यंदा भाऊबीज निमित्त प्रत्येक सेविका आणि मदतनीस यांना 2 हजार रुपयांची रक्कम देण्यात येणार असून, यासाठी राज्य सरकारने तब्बल 40.61 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ग्रामीण व शहरी भागात मुलांच्या संगोपनात, महिलांच्या आरोग्य आणि पोषणात तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासात महत्वाची भूमिका बजावत आहेत. लहान मुलांना आहार, शिक्षणाची प्राथमिक ओळख आणि मातांना आरोग्य मार्गदर्शन या कामांत त्यांचा मोठा वाटा आहे. दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचून त्या समाजातील खरी ‘शक्ती’ ठरतात. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भाऊबीज निमित्त ही भेट जाहीर करण्यात आली आहे. लवकरच ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाईल.”
सध्या राज्यभर हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. या निर्णयामुळे त्यांना थेट लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र या घोषणेबाबत कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “आम्हाला भाऊबीज नको, बोनस द्या,” अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटना करत आहेत. इतर सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळतो, मग अंगणवाडी कर्मचारी ज्यांनी ग्राउंडवर सर्वाधिक काम केले, त्यांना बोनस का नाही? आम्हाला भेट नको, तर किमान एक वेतन बोनस द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

