(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरात ‘या – त्या’ कारणाने रस्ते खोदण्याचे सत्र दिवसेंदिवस सुरूच आहे. कुठे पाईपलाइन, कुठे केबल तर कुठे गटार दुरुस्तीच्या नावाखाली चांगले रस्ते खोदले जातात. मात्र हे काम इतकेच, खणायचे आणि मोकळे व्हायचे! नंतर रस्ते सुरळीत करण्याची जबाबदारी जणू कुणाचीच नसल्यासारखी टाळली जाते. राम मंदीर देवळासमोरील खड्ड्यात केवळ माती टाकून त्यावरून टोकेरी दगड वर आले असून, त्याचा त्रास वाहनचालक आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
खोदकामानंतर बऱ्याच ठिकाणी माती टाकून वरून उघड्या टोकेऱ्या दगडांनी त्या खड्ड्यांवर फक्त नावालाच पृष्ठभाग तयार केला जातो. परिणामी वाहनचालक आणि पादचारी दोघांनाही रोजच्या प्रवासात त्रास सहन करावा लागतो. रस्त्यांची अवस्था इतकी वाईट होते की त्यावरून चालणे म्हणजे धाडसच वाटते. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे दुर्लक्ष आणि ठेकेदारांचे निष्काळजी काम यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
‘खोदकाम सुरू असले, तरी रस्ता पुन्हा मूळ स्थितीत आणण्याची जबाबदारी कोणी घेत नाही’, अशा सर्रास तक्रारी कानावर येतात. हे चित्र केवळ राम मंदिर परिसरापुरते मर्यादित नाही, तर शहरातील अनेक भागांत अशाच प्रकारचे ‘उघडे जखमेसारखे’ रस्ते दिसून येतात. त्यावर वाहन चालवणे म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. कामे करून रस्ते का बिघडवले जातात, आणि ती दुरुस्त का होत नाहीत? नगर परिषद आणि संबंधित विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देतील का? अशा प्रकाराने नागरिकांचे हाल करण्याचा ठेकेदारांचा आणि संबंधित अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा स्पष्टपणे समोर येतो. त्यामुळे नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन रस्ता सुरळीत करावा, अशी अपेक्षा आता सर्वसामान्यांना आहे.
अक्षरशः कमरेला “कळ” निघते…
नवीन काँक्रिट मार्गिका जुन्या डांबरीकरण केलेल्या रस्त्यांना जोडल्या जात असल्या तरी त्या जोडणाऱ्या ठिकाणी उंचीचा मोठा फरक ठेवण्यात आला आहे. परिणामी, वाहनचालकांना या उंच ठिकाणी जोरदार धक्के बसत असून, अक्षरशः कमरेला “कळ” निघत आहे. यातील गंभीर बाब म्हणजे हे काम थेट रहदारीच्या मध्यभागी किंवा मुख्य मार्गांवर करण्यात आले आहे. उंचवट्याचा अंदाज न घेता केलेल्या या जोडणींमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना झटका बसतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी हे रस्ते अपघाताचे कारण ठरू शकतात.